‘जलयुक्त’च्या कामांची त्रयस्थ एजन्सी करणार चौकशी
By Admin | Updated: June 5, 2017 00:06 IST2017-06-05T00:06:12+5:302017-06-05T00:06:12+5:30
जलयुक्त शिवार योजनेतंर्गत वनविभागाच्या जमिनीवर जलसंधारणाच्या कामांची त्रयस्थ एजन्सी चौकशी करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

‘जलयुक्त’च्या कामांची त्रयस्थ एजन्सी करणार चौकशी
वरिष्ठांचे आदेश : उपवनसंरक्षकांच्या बैठकीतील निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जलयुक्त शिवार योजनेतंर्गत वनविभागाच्या जमिनीवर जलसंधारणाच्या कामांची त्रयस्थ एजन्सी चौकशी करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार उपवनसंरक्षकांच्या बैठकीत सदर निर्णय झाला असून जेसीबी किंवा अन्य यंत्रामार्फत कामे झालीत काय? याची चाचपणी केली जाणार आहे.
खासदार आनंदराव अडसूळ यांनी शासनाकडे सादर केलेल्या तक्रारीनुसार वनजमिनीवर जेसीबीने खोदकाम करुन वननियमांचा भंग करण्यात आल्याचे नमूद केले आहे. जलयुक्त शिवार योजनेतंर्गत जलसंधारणाची कामे करताना जेसीबी व अन्य यंत्राद्वारे कामे करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात वनजमिनीवर जेसीबीने खोदकाम करुन जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. हा प्रकार वन (संवर्धन) अधिनियम, १९८० चा भंग करण्यात आल्याचे खा. अडसूळ यांची तक्रार आहे. या तक्रारीची दखल घेत शासनाने वनजमिनीवर जेसीबीने खोदकाम झाल्याप्रकरणी त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे कळविले. वरिष्ठांच्या आदेशानुसार उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ जून रोजी सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल अन्य वनाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत खासदारांचे प्रतिनिधी म्हणून कापशीकर होते. खा. अडसूळ यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जलयुक्त शिवार योजनेतील जल व मृदसंधारणाची कामे मंजूर कार्य आयोजनेत नमूद आहे किंवा नाही, सदर कामे करताना वन (संवर्धन) अधिनियम, १९८० चा भंग झाला काय, जेसीबी करण्यात आल्यास ती कोणत्या तरतुदीनुसार केली, हे स्पष्ट करावे, जल मृदसंधारणाची कामे तांत्रिक निकषानुसार केली अथवा नाही, आदी मुद्दे स्पष्ट करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कामांबाबतचा चौकशी अहवाल शासनाकडे सादर करावा लागेल, असे बैठकीत स्पष्ट केले आहे.