तपास अधिकाऱ्यांची प्रबळ साक्षीदारासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:30+5:30
आरोपी सागर तितुरमारे कारागृहात आहे. धामणगावच्या इतिहासात एवढी मोठी घटना घडूनही दत्तापूर पोलिसांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आले नाही. तपासात हयगय केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालून ठाणेदारांकडून तपास काढून मोर्शीच्या एसडीपीओ कविता फरतडे यांच्याकडे दिला.

तपास अधिकाऱ्यांची प्रबळ साक्षीदारासाठी भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : येथील गजबजल्या चौकानजीकच्या एका मैदानात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चाकुने भोसकून हत्या झाली. आरोपीच्या अटकेसाठी मोर्चे निघालेत. मात्र, नव्या पोलीस तपास अधिकाऱ्यांना प्रबळ साक्षीदार मिळेनासे झाले आहेत. अशा प्रत्यक्षदर्शी व नीडर साक्षीदारांसाठी भटकंती करण्याची वेळ आता पोलीस प्रशासनावर आली आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात धामणगाव शहरात इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. आरोपी सागर तितुरमारे कारागृहात आहे. धामणगावच्या इतिहासात एवढी मोठी घटना घडूनही दत्तापूर पोलिसांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आले नाही. तपासात हयगय केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालून ठाणेदारांकडून तपास काढून मोर्शीच्या एसडीपीओ कविता फरतडे यांच्याकडे दिला.
शुक्रवारी दिवसभर फडतरे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी घटना घडलेल्या परिसरातील प्रत्येक घरी विचारणा केली. ही घटना प्रत्यक्ष कुणी पाहिली याची माहिती घेतली. बहुतांश कुटुंब प्रमुख शासकीय नोकरीत असल्याने दुपारी कुणी घरी राहात नाही. त्यामुळे प्रत्यक्ष साक्षीदार पोलिसांना अद्याप मिळाले नसले तरी एक वयोवृद्ध व्यक्ती साक्षीदार म्हणून समोर आल्याचे कळते. विशेष म्हणजे घटन दरम्यान तेथे विद्यार्थी खेळत होते. जवळच माताजी मंदिरात भाविक बसतात. मात्र पोलिसांच्या चौकशीला कोण सामोरे जाणार, असे म्हणत साक्षीदार पुढे येण्यास तयार नाहीत. परिणामी प्रबळ साक्षीदार शोधणे पोलिसांसाठी अवघड झाल्याचे चित्र आहे.
पोलिसांशी असहकार्य
घटनेनंतर शहरात मोर्चे काढण्यात आले. त्या विद्यार्थिनीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे म्हणत सर्वांनीच मूकमोर्चात सहभाग घेतला. मात्र साक्ष देण्यास अद्यापही कोणी तयार नाही. तपास अधिकाऱ्यांनी अशा गंभीर प्रकरणात सहकार्य हवे आहे. ठाणेदार या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडक ल्याने त्यांनाच घटनेचे गांभीर्य कळत नसेल, तेच तक्रारीची दखल घेत नसेल, तर आपल्याला काय त्याचे, अशी भावना प्रबळ झाल्याने साक्षीदार समोर येत नसल्याची प्रतिक्रिया आहे.