अवैध होर्डिंग्ज हटाव मोहीम
By Admin | Updated: June 21, 2014 01:15 IST2014-06-21T01:15:30+5:302014-06-21T01:15:30+5:30
शहरात नियमांना छेद देत उभारण्यात आलेल्या अवैध होर्डिंग्ज हटाव मोहीम युवा सेनेने शुक्रवारपासून हाती घेतली आहे.

अवैध होर्डिंग्ज हटाव मोहीम
अमरावती : शहरात नियमांना छेद देत उभारण्यात आलेल्या अवैध होर्डिंग्ज हटाव मोहीम युवा सेनेने शुक्रवारपासून हाती घेतली आहे. आमदार अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वात येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील अवैध होर्डिंग्ज गॅस कटरने कापून हटविण्यासाठी अभिनव आंदोलन करण्यात आले.
युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सतबीरसिंग अरोरा, राहुल नावंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यकत्यांनी स्वत: गॅस कटर आणून फुटपाथवर उभारण्यात आलेले अवैध होर्डींग कापले. शहरात जागोजागी अनधिकृत अवैध होर्डिंग्ज उभारण्याचा सपाटा सुरू असताना या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष चालविले असा आरोप युवा सेनेचे राहुल नावंदे यांनी केला. अनधिकृत होर्डिंग्ज हे जनतेसाठी हानीकारक ठरत असताना ते तत्काळ हटविण्यात यावे, यासाठी महापालिकेला निवेदन देऊन अवगत करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने अवैध होर्डिंग्ज उभारणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई न करता त्याला अभय देण्याचा प्रकार सुरू आहे. एवढेच नव्हे तर अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली आहे. परंतु कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाचा नाकर्तेपणा उघडकीस आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी गॅसकटर आणून फुटपाथवर उभारलेले अवैध होर्डींग कापले. आता शहरात नियमबाह्य उभारण्यात आलेले होर्डींग हटविल्या गेले नाही तर युवा सेना हे होर्डींग काढून टाकणार असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात सतबीरसिंग अरोरा, शुभम जवंजाळ, वैभव मोहोकार, विक्की तायवाडे, पुष्कर चव्हाण, जयेश बोरकर, राम बुरघाटे, अंकित ससाने, कौस्तुभ कोरडे, तेजस ताथोड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)