‘आधार’ केंद्रांवर वाढतोय राजकीय कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप
By Admin | Updated: May 4, 2015 00:25 IST2015-05-04T00:25:21+5:302015-05-04T00:25:21+5:30
शहरातील बहुतांश आधारकार्ड केंद्रांवर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. कार्यकर्त्यांच्या जवळच्या ...

‘आधार’ केंद्रांवर वाढतोय राजकीय कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप
नागरिक वैतागले : सहा अधिकृत सेतू केंद्रांवर येताहेत कटू अनुभव
वैभव बाबरेकर अमरावती
शहरातील बहुतांश आधारकार्ड केंद्रांवर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. कार्यकर्त्यांच्या जवळच्या लोकांनाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे सामान्य नागरिकांची मात्र, हेळसांड होत आहे. सद्यस्थितीत शहरात सहा सेतू कार्यालयांमध्ये आधार नोंदणी अधिकृतरीत्या सुरू आहे. परंतु या केंद्रांवर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढल्याने नागरिकांना एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्राकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.
नागरिकांना त्यांचे नागरिकत्व सिध्द करता यावे, या उद्देशाने केंद्र शासनाने आधारकार्डची संकल्पना मांडल्यानंतर देशभरात युध्दस्तरावर आधार नोंदणी सुरु झाली. कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन नागरिक आधार नोंदणी करु शकतात, अशी सोय शासनाने उपलब्ध करून दिली. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील विविध भागांत आधार केंद्रे उघडण्यात आली आहेत. सद्यस्थितीत शहरात २२ सेतू केंद्र कार्यरत असून तेथे विविध प्रकारची कामे केली जातात. यापैकी ६ सेतू केंद्रांवर आधार नोंदणी प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली आहे.
हमालपुरा, राझिलनगर, चिलम छावणी, शेगाव नाका, बडनेरा व बियाणी चौक अशा सहा सेतुंवर आधार नोंदणी सुरु आहे. ज्यांची आधार नोंदणी झालेली नाही असे नागरिक शहरातील विविध सेतुंवर जाऊन आधार नोंदणी करीत आहेत.
वाढदिवसानिमित्त आधार नोंदणी शिबिर
शासनाने शहरातील सहा सेतू केंद्रांवर अधिकृत आधार केंद्र दिली आहेत. मात्र, सुजाण नागरिक खासगी कार्यक्रमानिमित्तही आधार नोंदणी शिबिरे घेत आहेत. राजकमल चौकात एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त आधार नोंदणी शिबिर घेण्याबाबतचे फलक लावल्याचे आढळले होते. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हे शिबिर बंद करण्याचे आदेश दिले होते.
सेतू केंद्रांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचा वाढता हस्तक्षेप ही चुकीची बाब आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी टोकन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. त्याबद्दल सेतूच्या अधीक्षकाला सूचना देण्यात आल्या आहेत. नमुन्यातील कॅम्पबद्दल तक्रारी आल्या असून तो कॅम्प आता संपला आहे.
- सैयद सईद कादरी,
जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, (ई-प्रशासन)