आंतरराष्ट्रीय 'सट्टा' सोयाबीन घसरले !

By Admin | Updated: February 20, 2015 00:09 IST2015-02-20T00:09:37+5:302015-02-20T00:09:37+5:30

खरीप २०१४ चे ९० टक्के पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापसाला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे.

International 'speculative' soybean dropped! | आंतरराष्ट्रीय 'सट्टा' सोयाबीन घसरले !

आंतरराष्ट्रीय 'सट्टा' सोयाबीन घसरले !

लोकमत विशेष
गजानन मोहोड अमरावती
खरीप २०१४ चे ९० टक्के पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापसाला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे. सोने, चांदीसह कापूस व सोयाबीन हे एनसीडीईएक्स (नॅशनल कमोडीटी डेरीव्हेशन एक्सचेंज लिमीटेड) मध्ये समाविष्ट आहे. मात्र तुरीचा यामध्ये समावेश नसल्याने या आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे तुरीच्या भावात वाढ होत आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात दररोज सकाळी ११.३० वाजतादरम्यान एनसीडीईएक्सचे दर (व्यापाऱ्यांच्या भाषेत डबा) उघडतात व त्यानुसार शेतमालाचे भाव ठरविण्यात येऊन बाजार समितीमध्ये मालाची खरेदी प्रक्रिया सुरू होते. यावर्षी ब्राझील, अर्जेंटीना व अमेरिका या देशात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे भारताचा सर्वात मोठा ग्राहक देश असलेल्या चीनकडून मागणी कमी झाली. आंतरराष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत भारताचे उत्पादन हे ५ ते ७ टक्क्यांनी कमी असल्याचा परिणाम निर्यातीवर झाला व याचा थेट परिणाम होऊन सोयाबीनचे भाव यंदा पडले आहे.
सोयाबीनप्रमाणे कापसासाठी देखील चीन मोठा ग्राहक आहे. मात्र आॅस्ट्रेलिया व अमेरिकेत कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्याचप्रमाणे चीनमध्येदेखील कापूस उत्पादन अधिक झाले. भारतातून दरवर्षी दीड कोटी कापसाच्या गाठी निर्यात केल्या जातात. यंदा ५० लाख गाठीची निर्यात अद्यापपर्यंत झालेली नाही. यंदा भारतामध्ये ४ कोटी ५० लाख गाठी तयार करण्यात आल्या. देशातील सूतगिरणीद्वारा साधारणपणे ३ कोटी १५ लाख गाठींची खरेदी करण्यात येते. उर्वरित १ कोटीवर गाठींना मागणी नाही. मागील वर्षीच्या २५ ते ३० लाख कापसाच्या गाठी निर्यातीअभावी अद्याप शिल्लक आहेत. यामुळे कापसाचे दर हमीभावाच्या आत असल्याची माहिती अमरावती बाजार समितीचे अडते, व्यापारी अमर बांबल यांनी दिली.
मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस व सोंगणी, मळणीच्या काळात परतीचा पाऊस व गारपीट यामुळे सोयाबीन उत्पादनात कमी होऊन सोयाबीन डागी झाले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्यामुळे एफएक्यू ग्रेडच्या सोयाबीनला चार हजारांवर भाव मिळाला.
यंदा सोयाबीनचे दर ३००० ते ३२०० रूपये प्रतिक्विंटल दरम्यान स्थिरावले आहे. कापसाच्या हमीभावात ४ हजार ५० रुपये असताना ग्रामीण भागात तर ३५०० रूपये क्विंटलने कापसाची खरेदी होत आहे.
जिल्ह्यात खरीप २०१४ मध्ये ६ लाख ७९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यापैकी ३ लाख १९ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन व १ लाख ९४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रात कपासीची पेरणी झाली आहे. एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के हे पेरणीक्षेत्र आहे. या हंगामात पेरणीपासून उशिरा पाऊस व नंतर खंड यामुळे सोयाबीन उत्पादनात ७० ते ७५ टक्क््यांनी कमी झाली. जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. उत्पादन कमी असताना मागणी कमी असल्यामुळे सोयाबीन व कापसाचे भाव पडले. याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Web Title: International 'speculative' soybean dropped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.