आंतरधर्मीय विवाहामुळे तणाव, पोलिसांची मध्यस्थी
By Admin | Updated: July 7, 2015 00:03 IST2015-07-07T00:03:59+5:302015-07-07T00:03:59+5:30
आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्याला सोमवारी सकाळी गाडगेनगर पोलिसांनी पंचवटी चौकात पकडले.

आंतरधर्मीय विवाहामुळे तणाव, पोलिसांची मध्यस्थी
दोन समुदाय समोरासमोर : पोलीस ठाण्यांत होती मुलगी हरविल्याची तक्रार
अमरावती : आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्याला सोमवारी सकाळी गाडगेनगर पोलिसांनी पंचवटी चौकात पकडले. दोंघाच्या नातेवाईक समोरासमोर आल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. काही वेळाने तणाव निवळला. त्यातच कारंजा लाड पोलिसही चौकशीकरिता गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली .
कारंजा लाड येथील रहिवासी असलम अली मोहम्मद अली व तेथीलच १९ वर्षीय युवतीने २८ जून रोजी प्रेमप्रकरणातून पळून जाऊन लग्न केले. मुलीच्या नातेवाईकांनी ४ जुलै रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान आंतरधर्मिय लग्न केल्याबद्दल या जोडप्याने कारंजा लाड पोलीस ठाण्याला माहिती दिली होती. सोमवारी सकाळी या दोघांनाही स्थानिक पंचवटी चौकात गाडगेनगर पोलिसांनी पकडले. त्यांना चौकशीकरिता ठाण्यात नेले. त्यानंतर दोघांच्याही नातेवाईकांना ठाण्यात बोलविले. त्यानंतर वादावादीतून तणाव निर्माण झाला. जोडपे सज्ञान असल्यामुळे पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढली. अतिरीक्त पोलीस ताफा ठाण्यात तैनात करण्यात आला होता. दोघांनीही सोबत राहण्याची इच्छा दर्शविल्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिले. (प्रतिनिधी)
हिंदू संघटना सरसावल्या
या आंतरधर्मिय विवाहाची माहिती शहरातील हिंदू-मुस्लिम संघटनांना मिळाली. त्यामुळे या संघटनांचे कार्यकर्ते गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. हिंदू मुलीच्या नातेवाईकांची बाजू संघटनांनी मांडली. मात्र, लग्न झालेल्या जोडप्याने सोबत राहण्याची ईच्छा दर्शविल्याने त्यांना आडकाठी करता आली नाही.
मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून हरविल्याची नोंद पोलिसांनी घेतली होती. मात्र, या दोघांनी कायदेशीर विवाह केला आहे. नातेवाईक विरोध करीत असले तरी दोघेही सज्ञान असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही.
- सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त.