अंतरगाववासीयांनी नाकारले मतदान !
By Admin | Updated: February 22, 2017 00:18 IST2017-02-22T00:18:49+5:302017-02-22T00:18:49+5:30
लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २५ वर्षांपासून गावचा विकास रखडल्याच्या निषेधार्थ मतदान न करण्याच्या निर्णयावर अंतरगाववासी मतदानाच्या दिवशीही ठाम राहिले.

अंतरगाववासीयांनी नाकारले मतदान !
गावकऱ्यांनी पाळला निर्धार : प्रशासनाची मध्यस्थी अयशस्वी
येवदा : लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २५ वर्षांपासून गावचा विकास रखडल्याच्या निषेधार्थ मतदान न करण्याच्या निर्णयावर अंतरगाववासी मतदानाच्या दिवशीही ठाम राहिले. निवडणुकीत मतदान न करण्याच्या निर्णयामुळे हे गाव प्रकाशझोतात आले होते. दरम्यान गावकऱ्यांनी उमेदवारांच्या प्रचारवाहनांना गावबंदी करून रोष व्यक्त केला. गावकऱ्यांनी मंगळवारी मतदान न करण्याचा निर्धार कायम ठेवला. तीन ते चार शासकीय कर्मचारी वगळता कोणीही गावकरी मतदानासाठी बाहेर पडले नाहीत.
दर्यापूर तालुक्यातील अंतरगाव शिवाजी या गावाची लोकसंख्या १ हजाराचे वर असून येथे ५६४ मतदार आहेत. गावाची सद्यस्थिती अत्यंत वाईट असून मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. वारंवार मागण्या करून कंटाळलेल्या गावकऱ्यांनी यंदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्धार केला होता. येथील मतदान केंद्राला सहायक निवडणूक निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली असता एकही गावकरी मतदानासाठी पोहोचला नसल्याचे चित्र दिसून आले. (वार्ताहर)
शासकीय कर्मचाऱ्यांवर मतदानाची सक्ती
झोनल अधिकारी अरविंद गुडधे व नायब तहसीलदार एम.डी.चव्हाण यांनी येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस तसेच गावचे पोलीस पाटील जयंत कथलकर यांना नोकरीवरून कमी करण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून मतदान करवून घेतल्याचा आरोप या तिघांनी केला आहे. ओळखपत्र आणण्याची सवड न देताच मतदान प्रक्रिया उरकण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे.
निवडणूक केंद्रावरील व्यक्तिने आम्हाला बोलावून नेले. बीडीओंनी ‘तु्म्हाला नोकरी करायची नाही का’ असा धाक दाखवून दमदाटी करून मतदान करण्यास बाध्य केले. माझ्या मदतनिसालासुद्धा असाच धाक दाखवला.
- सविता कथलकर,
अंगणवाडी सेविका, अंतरगाव
पोलीस पाटील म्हणून मी मतदान केंद्रावर उपस्थित होतो. निवडणूक केंद्राला भेट देण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने माझ्याकडून मतदान करवून घेतले. ओळखपत्र आणण्याची सवडही दिली नाही.
-जयंत कथलकर,
पोलीस पाटील, अंतरगाव