आंतर मशागतीच्या कामांना वेग
By Admin | Updated: July 29, 2016 00:19 IST2016-07-29T00:19:30+5:302016-07-29T00:19:30+5:30
जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला असून सर्वच शेतशिवार हिरवळीने फुलून गेले आहे.

आंतर मशागतीच्या कामांना वेग
पिकांची वाढ जोमदार : शेतकऱ्यांना कामांसाठी मिळेनात मजूर
हिरापूर : जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला असून सर्वच शेतशिवार हिरवळीने फुलून गेले आहे. अधूनमधून पाऊसही हजेरी लावत असल्याने पिकांची जोमाने वाढ होताना दिसते. आता आंतर मशागतीच्या कामांनी वेग घेतला असून त्यामध्ये कोळपणी (डव्हरणी), निंदन, तणनाशक, कीटकनाशक फवारणींच्या कामांची लगबग सुरू आहे. मात्र शेतातील कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
खरीप हंगामातील पिके ही मोसमी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टासोबतच पावसाची साथ मिळणे गरजेचे आहे. मागील हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीला लावलेला खर्चदेखील निघालेला नाही. मात्र यंदा सुरुवातीपासूनच मोसमी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले संकेत दिले. त्यामुळे काही तालुक्यांत मृग नक्षत्रातच पेरणीला वेग आला होता तर त्यानंतरच्या कालखंडात काही तालुक्यात पेरणीची कामे आटोपली मात्र त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक पावसाने शेतकरी वर्ग आनंदून गेला आहे. शेतातील पिकांची चांगली वाढ होत असल्याने आंतरमशागतींच्या कामांना वेग आला आहे.
शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे घरची मंडळीच सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतात राबत आहेत. त्यात सुटीच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांचीदेखील थोडीफार मदत होते. निंदणाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी तणनाशक फवारणी करतात. मात्र फवारणीच्या कामासाठीदेखील पुरुष मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक नव्हे तोच दुसरे संकट उभे ठाकले आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
मजुरांची ने-आण शेतकऱ्यांकडे
ग्रामीण भागातून दुसऱ्या गावातील शेतात मजूर न्यावयाचे झाल्यास शेतमालकाला या मजुरांची ने-आण करावयाची जबाबदारी घ्यावी लागते. सकाळी गावात वाहन नेऊन त्या ठिकाणाहून मजूर घेऊन शेतात जाणे. सायंकाळी काम संपताच मजुरांना रोख स्वरुपात मजुरी देऊन घरापर्यंत सोडावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक मजुरामागे किमान ५० रूपये खर्च येतो.
मजुरीचे दर भिडले गगनाला
मजुरीचे दर प्रत्येक गावात वेगवेगळे आहेत. शहरात वेगळे तर ग्रामीण भागात वेगळे आहेत त्यामुळे महिलांना निंदणीच्या मजुरीपोटी १०० ते १५० रुपयादरम्यान मजुरी मिळते तर पुरुषाच्या मजुरीचा दर हा कामावरून ठरलेला असतो. किमान १५० रुपयांपासून ते कमाल २५० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. परिणामी शेतात मजूर लावणेदेखील शेतकऱ्यांना कठीण जात आहे.
मजुरांचे संघटन
ग्रामीण भागात मजुरांचे संघटन केले जात आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे, तर मजुरांची संघटन करणारी व्यक्ती ही जास्तीत जास्त मोबदला देण्यास तयार असतो त्यामुळे बहुतांश मजूर अशा संघटनांमध्ये काम करण्यास तयार असतात व अधिक शेती असलेला शेतकरी एकाच दिवशी ५० ते १०० मजूर लावून कामे करून घेतात. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे.