संत्र्याला विम्याचे कवच
By Admin | Updated: December 8, 2015 00:12 IST2015-12-08T00:12:46+5:302015-12-08T00:12:46+5:30
राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा राज्यात अधिसूचित पिकांसाठी राबविण्याचा ..

संत्र्याला विम्याचे कवच
फळपीक विमा योजना : केळी, मोसंबीचा समावेश, १० डिसेंबर अंतिम मुदत
अमरावती : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा राज्यात अधिसूचित पिकांसाठी राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने ३ डिसेंबरला घेतला. अमरावती जिल्ह्यात संत्रा, केळी व मोसंबी या फळपिकांचा समावेश योजनेत करण्यात आलेला आहे. संत्रा पिकासाठी १२ तालुक्यांमधील ७० महसूल मंडळांत ही योजना राबविण्यात येणार आहे. शेतकरी सभासदांना योजनेत सहभागी होण्यासाठी १० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.
पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून विमा योजनेच्या तरतुदीप्रमाणे फळपिकांना निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे तसेच हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा योजनेचा उद्देश आहे. सन २०१५-१६ मध्ये आंबिया बहर हंगामामध्ये फळपिकांसाठी विमा संरक्षण देय राहणार आहे. विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्याची अधिसूचित फळपिकासाठी पीककर्ज मर्यादा मंजूर आहे, अशा सर्व कर्जदारांनी ही योजना सक्तीची आहे. मात्र बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. अधिसूचित फळपिकासाठी किमान २० हेक्टर किंवा जास्त उत्पादन क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात ही योजना राबविण्यात येणार आहे.
फळपिकासाठी विमा हप्ता दर १२ टक्के असून केंद्र व राज्य शासनाचे प्रत्येकी ५० टक्के अनुदान राहणार आहे.
संत्रा पिकासाठी अमरावती तालुक्यात अमरावती, वडाळी, बडनेरा, नवसारी, डवरगाव, माहुली जहागीर, नांदगाव या महसूल मंडळात भातकुली तालुक्यात निंभा महसूल मंडळात, धामणगाव रेल्वे तालुक्यात धामणगाव, चिंचोली, भातकुली, अंजनसिंगी, मंगरुळ दस्तगीर, दत्तापूर व तळेगाव दशासर या मंडळांत नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदगाव खंडेश्वर, दाभा, शिवणी, रसुलापूर, मंगरुळ चव्हाळा, पापळ, लोणी, धानोरा गुरव, माहुली चोर या मंडळामध्ये मोर्शी तालुक्यात अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, धामणगाव (काटपूर), नेरपिंगळाई, शिरखेड, मोर्शी या मंडळात तसेच वरूड तालुक्यात वरूड, बेनोडा, पुसला, वाठोडा, लोणी, शेंदूरजनाघाट, राजुराबाजार या महसूल मंडळांत. तिवसा तालुक्यात तिवसा, मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा, वरखेड या मंडळांत. चांदूरबजार तालुक्यात चांदूरबाजार, ब्राह्मणवाडा थडी, बेलोरा, करजगाव, शिरजगाव कसबा, तळेगाव मोहना तर अचलपूर तालुक्यात अचलपूर, रासेगाव, असदपूर, परसापूर, पथ्रोट, परतवाडा. चिखलदरा तालुक्यात चिखलदरा, सेमाडोह, टेंभूरसोंडा व अंजनगाव सुर्जी तालुक्यात अंजनगाव, भंडारज, विहिगाव, सातेगाव, कापूसतळणी, कोकर्डा या महसूल मंडळांचा योजनेत समावेश आहे. शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)