दर्यापूर, थिलोरी मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिळाले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:05+5:302021-07-09T04:10:05+5:30
दर्यापूर तालुक्यात खरीप २०२० मध्ये नुकसान झालेल्या मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांना विमा रकमेची तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ...

दर्यापूर, थिलोरी मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिळाले यश
दर्यापूर तालुक्यात खरीप २०२० मध्ये नुकसान झालेल्या मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांना विमा रकमेची तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक रक्कम पात्र होती. यंदाच्या खरीप पेरणीच्या अनुषंगाने ती रक्कम तातडीने मिळावी, यासाठी शेतकरी वारंवार तहसील कार्यालय, कृषी विभाग कार्यालय येथे फेऱ्या मारत होते. खरीप २०२० मध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व ज्वारी या पिकांसाठी ३७ हजार ७९३ शेतकऱ्यांनी ४० हजार ५३६ हेक्टरसाठी विमा काढलेला होता. दर्यापूर तालुक्यात उडीद पिकाचा विमा मंजूर झाला. मात्र, दर्यापूर व थिलोरी या दोन महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून विमा रक्कम मिळाली नव्हती. या दोन महसूल मंडळांमध्ये ३८५१ शेतकऱ्यांना एकूण ७ कोटी ७३ लाख ४७ हजार ९२८ रुपये मूग या पिकासाठी मंजूर झाले होते. मात्र, विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पाच महिने विमा रकमेपासून वंचित राहावे लागले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत एकही शेतकरी आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा चांगलेच धारेवर धरले होते. अखेर विमा कंपनी नमली व त्यांनी शेतकऱ्यांना १० जुलैपर्यंत विमा रक्कम देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका मागे घेतली. गुरुवार रोजी थिलोरी व दर्यापूर या दोन्ही मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा झाली आहे.
080721\184853e.jpg
दर्यापूर थिलोरी मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा... शेतकर्यांच्या आंदोलनाला मिळाले यश