१८ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ
By Admin | Updated: September 10, 2014 23:17 IST2014-09-10T23:17:35+5:302014-09-10T23:17:35+5:30
तालुक्यात २०१३ -१४ च्या खरीप हंगामात, स्थानिक कृषी विभागाकडून २ हजार ८५६ हेक्टर ७४ आर.क्षेत्रातील विविध पिकांचा विमा काढला होता. यात २ हजार ११ शेतकऱ्यांनी भाग घेतला.

१८ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ
चांदूरबाजार : तालुक्यात २०१३ -१४ च्या खरीप हंगामात, स्थानिक कृषी विभागाकडून २ हजार ८५६ हेक्टर ७४ आर.क्षेत्रातील विविध पिकांचा विमा काढला होता. यात २ हजार ११ शेतकऱ्यांनी भाग घेतला. यात विमा कंपनीने विमा संरक्षित क्षेत्राकरिता ३ कोटी ६३ लाख ९२ हजार २४९ रूपये विमा हप्ता शेतकऱ्यांकडून वसूल केला. परंतु परतावा देताना मात्र केवळ १८ शेतकऱ्यांना ३८ हजार ८१५ रूपये इतक्याच रकमेचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांमध्ये शासन व विमा कंपनी विषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
खरीप हंगामात तालुक्यातील सात महसुली मंडळांत ७६४ हेक्टर कापूस, ९८३ हेक्टर सोयाबीन, २३३ हेक्टर तूर, २३ हेक्टर मूग व ८५३ हेक्टरवर ज्वारी, उडीद व इतर पिकांचा विमा काढण्यात आला होता. यात चांदूरबाजार मंडळामध्ये १११४ शेतकऱ्यांनी ५६९ हेक्टर कापूस, ४३९ हेक्टर सोयाबीन, १०३ हेक्टर तूर, ३ हेक्टर मूग पिकांचा काढला होता. तर बेलोरा मंडलमध्ये ३३४ शेतकऱ्यांनी २४५ हेक्टरवर सोयाबीन, ५८ हेक्टर तूर, २२ हेक्टर कपाशी, ८ हेक्टर मूग या पिकांचा विमा काढला होता.
तसेच आसेगाव मंंडलमध्ये २९६ शेतकऱ्यांनी १८६ हेक्टर सोयाबीन, ६६ हेक्टरमध्ये तूर, ३६ हेक्टरमध्ये कापूस, ८ हेक्टरमध्ये मूग, ब्राह्मणवाडा थडी मंडलमध्ये १०९ शेतकऱ्यांनी ७५ हेक्टरमध्ये कापूस, ६ हेक्टरमध्ये तूर, २८ हेक्टरमध्ये सोयाबीनचा विमा काढला. शिरजगाव कसबा मंडळमध्ये ३३ शेतकऱ्यांनी १९ हेक्टर सोयाबीन, ८ हेक्टरमध्ये कपाशी, ४ हेक्टरमध्ये मूग तर करजगाव मंडळमध्ये ४ शेतकऱ्यांनी ५ हेक्टर कपाशी व मूग या पिकांचा विमा काढला होता. तळेगाव मोहना मंडलमध्ये ११८ शेतकऱ्यांनी ६७ हेक्टर सोयाबीन व ५० हेक्टर कपाशीचा विमा काढला होता. या सातही मंडलमध्ये २०११ शेतकऱ्यांनी पीकनिहाय क्षेत्र विविध पिकांसाठी संरक्षित केले होते. परंतु विमा कंपनीने यातील १८ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला. सात मंडळांपैकी चांदूरबाजार मंडळामध्ये चार शेतकऱ्यांना १२ हजार ५५८ रूपये, करजगाव मंडळात एका शेतकऱ्याला १ हजार १६६ रूपये, शिरजगाव मंडळात ४ शेतकऱ्यांना ४ हजार ८४ रूपये, बेलोरा मंडळात ९ शेतकऱ्यांना १९ हजार ६ रूपये लाभ देण्यात आला. उर्वरित तीन मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना एकही छदाम देण्यात आला नाही, हे विशेष.
पीक विम्याच्या ३११ कोटी रूपयांच्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी १ कोटी ६० लाख ८४ हजार ६७४ रूपये बँकेत भरले होते. शासनाकडून विमा कंपनीला अनुदानाचे २ कोटी ३ लाख ७ हजार ५७५ रूपये देय आहेत. वि हप्ता भरूनसुध्दा विमा कंपनीने केवळ १८ शेतकऱ्यांना ३८ हजार रूपयांचेच पीक विमा संरक्षण द्यावे, हे एक न सुटणारेच कोडे आहे. शासन व विमा कंपनीच्या एकंदरीत स्थितीवरून शेतकरी वर्गांत प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. (शहर प्रतिनिधी)