Insufficient space for evaluation at the University | विद्यापीठात मूल्यांकनासाठी जागा अपुरी
विद्यापीठात मूल्यांकनासाठी जागा अपुरी

ठळक मुद्देछतावर टाकला पेंडॉल : सोमवारी ८०० परीक्षकांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन विभागात परीक्षकांना मूल्यांकनासाठी जागा अपुरी पडत आहे. एकाच वेळी ८०० पेक्षा अधिक परीक्षकांनी हजेरी नोंदविल्याने पर्याय म्हणून छतावर पेंडॉल टाकण्यात आला. आता या पेंडॉलमध्ये मूल्यांकन होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. मात्र, गत दोन ते तीन वर्षांपासून निकालात अनियमितता असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. वेळेत मूल्यांकन होत नसल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे हिवाळी २०१९ परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात येत आहे. एकीकडे परीक्षा आणि निकाल अशा दोनही बाबी एकाच वेळी सुरू आहे. मध्यंतरी परीक्षा आणि निकालात दिरंगाई करणाऱ्या परीक्षकांवर पाच हजारांचा दंड व सेवापुस्तिकेत नोंदीची कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यानुसार दोषी परीक्षकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परिणामी हिवाळी परीक्षेच्या मूल्यांकनासाठी परीक्षकांनी एकच गर्दी केली आहे. सोमवारी परीक्षकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. त्यामुळे मूल्यांकन विभागात परीक्षकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. काही परीक्षकांना उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी खुल्या जागेवर टेबल टाकण्याची सोय करण्यात आली होती. मूल्यांकनासाठी हॉल अपुरे पडत असल्याने प्रशासनाने पेंडॉलची व्यवस्था केली आहे. मंगळवारपासून या पेंडॉलमध्ये परीक्षकांना मूल्यांकनाचे कर्तव्य बजवावे लागणार आहे. सोमवारी २० परीक्षांचे निकाल जाहीर झाले.

भंगार टेबलची दुरूस्ती
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात मूल्यांकनासाठी परीक्षकांनी गर्दी केल्यामुळे वेळेवर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व्हावे, यासाठी हॉलऐवजी टेरेसवर पेंडॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षकांना मूल्यांकनासाठी टेबल आवश्यक असल्यामुळे भंगारमध्ये पडलेल्या लोखंडी टेबलची दुरूस्ती करण्यात आली. सुमारे २५ ते ३० टेबलची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात आली असून, हे टेबल परीक्षकांसाठी वापरले जाणार आहे.

Web Title: Insufficient space for evaluation at the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.