‘त्या’ वनजागेवरील मूर्ती हटविण्याचे निर्देश
By Admin | Updated: December 21, 2015 00:02 IST2015-12-21T00:02:06+5:302015-12-21T00:02:06+5:30
येथील राज्य राखीव सुरक्षा दल वसाहती (५०० क्वॉटर्स) च्या मागील बाजूस वनविभागाच्या टेकडीवर निर्माणाधीन अतिक्रमित धार्मिक स्थळांची वनाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली.

‘त्या’ वनजागेवरील मूर्ती हटविण्याचे निर्देश
आठवडाभराचा अल्टिमेटम् : सीसीएफ, डीएफओंची घटनास्थळी भेट
अमरावती : येथील राज्य राखीव सुरक्षा दल वसाहती (५०० क्वॉटर्स) च्या मागील बाजूस वनविभागाच्या टेकडीवर निर्माणाधीन अतिक्रमित धार्मिक स्थळांची वनाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. अतिक्रमणधारकांना मूर्ती व अन्य वस्तू त्वरेने हटविण्याचे निर्देश देण्यात आलेत.
मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर आदी वनाधिकाऱ्यांचा फौजफाटा अतिक्रमित धार्मिक स्थळी पोहोचला. या स्थळी बुध्दविहारस तयार करण्यात आले असून येथे पंचशील ध्वज उभारण्यात आला आहे. याच परिसरात नव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारे मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्त्वात वनाधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. येथे उपस्थित भन्ते संघपाल आदी कार्यकर्त्यांना हे अतिक्रमण हटविण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेत. आठवड्याच्या आत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण न हटविल्यास वनविभाग हे अतिक्रमण काढून घेणार, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा निर्मितीचे सुरु असलेले कार्य वनाधिकाऱ्यांनी बंद पाडले. हे अतिक्रमण दीड ते दोन वर्षांपासून असताना ते आतापर्यंत वनविभागाने का हटविले नाही, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. वनविभागाच्या टेकडीवरील दर्शनी भागात हे धार्मिक अतिक्रमण केले जात असताना जबाबदार वनाधिकाऱ्यांनी ते काढण्याची कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वी उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या नेतृत्त्वात वनविभागाने अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला असता कायदा व सुव्यस्थेमुळे ते हटविता आले नाही.
आठ दिवसांत अतिक्रमण काढू
अमरावती : मात्र, आता वनविभागाने टेकडीवरील अतिक्रमण हटविण्याची रणनिती आखली आहे. पुढच्या आठ दिवसात ते पोलीस बंदोबस्तात हटविले जाईल, अशी माहिती आहे. या परिसरात तीन ते चार वर्षांपासून गौतम बुध्दाची मूर्ती बसविण्यात आली आहे, हे विशेष. कारवाई दरम्यान घटनास्थळी अमोल इंगळे, भन्ते संघपाल, मनोज थोरात, सुनील राऊत, विश्वास वानखडे, अनिल फुलझेले, आशिष डोंगरे, मनोज वानखडे, विश्वास भालेराव आदी उपस्थित होते. दरम्यान साकारत असलेला डॉ. आंबेडकरांचा पुतळा त्वरित हटविला जाईल, असे आश्वासन वन विभागाला अतिक्रमणधारकांनी दिले.