रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी
By Admin | Updated: September 14, 2015 00:08 IST2015-09-14T00:08:33+5:302015-09-14T00:08:33+5:30
बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या जागेची मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गत आठवड्यात पाहणी केली आहे.

रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी
अमरावती : बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या जागेची मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गत आठवड्यात पाहणी केली आहे. या प्रकल्पाच्या निविदा अंतिम टप्प्यात असून पटणा येथे लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. कारखाना निर्मितीची जबाबदारी पुणे येथील एका एजन्सीला सोपविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बडनेरा येथील पाचबंगला परिसरात उत्तमसरा मार्गालगत रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना साकारला जात आहे. रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी पटणा येथील रेल्वे बांधकाम विभागाकडे सोपविली आहे. निविदा प्रक्रिया ते बांधकाम पूर्ण होईस्तोवरचे पटणा रेल्वे बांधकाम विभागाकडे जबाबदारी निश्चित केली आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया राबविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. ई-निविदा प्रक्रिया राबवून या प्रकल्पाचे बांधकाम निर्मितीसाठी एजन्सी निश्चित करण्यासाठी पटणा रेल्वे बांधकाम विभाग कामाला लागला आहे. आठवडाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने या प्रकल्पासाठी मुंबई मध्य रेल्वे विभागाने उपअभियंता मोहन नाडगे यांची विशेष जबाबदारी निश्चित करुन नियुक्ती केली आहे. यापूर्वी मोहन नाडगे यांच्या देखरेखीत मॉडेल रेल्वे स्थानक, नरखेड रेल्वे मार्ग, अमरावती- नागपूर कॉर्ड लाईन, अमरावती रेल्वे स्टेशनवरील वाशींग युनीट, अकोली रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना हा प्रकल्प व्यवस्थितरीत्या पूर्णत्वास जावा, यासाठी उपअभियंता मोहन नाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही वर्षांपासून प्रलंबित असलेला रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचा विषय मार्गी लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. प्रकल्प निर्मितीत अडथळे येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक, बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. १९६ एकर जागेवर निर्माण होणारा हा प्रकल्प सुमारे २०० कोटी रुपये खर्चून पूर्णत्वास आणला जाणार आहे.