तपासणी मशिनरीज नादुरुस्त, रुग्ण वाऱ्यावर
By Admin | Updated: June 25, 2015 00:12 IST2015-06-25T00:12:59+5:302015-06-25T00:12:59+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय हे आरोग्याच्या दृष्टीने गोरगरिबांचा आधार समजले जाते.

तपासणी मशिनरीज नादुरुस्त, रुग्ण वाऱ्यावर
इर्विनचा बेताल कारभार : बाहेरून रक्त तपासणीचा डॉक्टरांचा सल्ला
इंदल चव्हाण अमरावती
जिल्हा सामान्य रुग्णालय हे आरोग्याच्या दृष्टीने गोरगरिबांचा आधार समजले जाते. येथे विविध आजारांची तपासणी करणाऱ्या मशिनरीज उपलब्ध आहेत. मात्र, त्या नादुरुस्त असल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना तपासणीकरिता बाहेर जाण्याचा सल्ला डॉक्टर देत असल्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्हाभरातील क्रिटिकल आजारांनी बाधित गोरगरीब रुग्ण योग्य उपचाराच्या आशेने जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात. त्यामुळे येथे रुग्णांची प्रत्येक वॉर्डात गर्दीदेखील असते. त्या दृष्टीने येथे विभागवार उपचाराची सोयसुद्धा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर शासनाकडून कोट्यवधींचा निधीदेखील दरवर्षी प्राप्त होतो. मात्र येथील रुग्णांना रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, किडनी तपासणी, सीटी स्कॅनसाठी इतर ठिकाणी स्वखर्चाने करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. यासाठी रुग्णांना इतर ठिकाणी आजारपणात ने-आण करताना त्रास सहन करावा लागतो. गोरगरीब रुग्ण हा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे साधारण आजारांकडे दुर्लक्ष होऊन रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याच्या रूग्णांच्या नातलगांच्या तक्रारी आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.