मद्य, पैसा वाटपावर आयोगाची सूक्ष्मदृष्टी
By Admin | Updated: October 5, 2014 22:57 IST2014-10-05T22:57:28+5:302014-10-05T22:57:28+5:30
विधानसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्षांद्वारे होणाऱ्या गैरप्रकारावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष आहे. उमेदवार व समर्थकांद्वारा होणारी मद्याची बेकायदा वाहतूक, मद्याचे व पैशांचे वाटप

मद्य, पैसा वाटपावर आयोगाची सूक्ष्मदृष्टी
अमरावती : विधानसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्षांद्वारे होणाऱ्या गैरप्रकारावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष आहे. उमेदवार व समर्थकांद्वारा होणारी मद्याची बेकायदा वाहतूक, मद्याचे व पैशांचे वाटप रोखण्यासाठी आयोगाचे पथक तैनात आहेत.
मद्य व पैसे वाटपाला आळा बसविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अमरावती-मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी केली आहे. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलिसांच्या सहकार्याने प्रशासनाने उमेदवार व राजकीय पक्षांची हवा ‘टाईट’ केली आहे. प्रत्येक निवडणुकीत मद्य व पैशांचे वाटप केले जाते व अशा प्रकारांत कारवाईदेखील केली आहे. तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत जिल्हा सीमेवर तपासणीदरम्यान वाहनात जवळपास २ कोटी रुपये आढळून आले होते. या निवडणुकीत आतापर्यंत २५ लाख रुपये पकडण्यात आले आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
पोलीस दारुबंदी, उत्पादन शुल्क, आयकर विक्रीकर आदी विभागांचे कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या मदतीने या निवडणुकीत गैरप्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भौगोलिकदृष्ट्या विचार करुन किमान ४ ते ५ पथकांचा ‘वॉच’ राहणार आहे.
निवडणूक काळात अमरावती-मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी सुरु आहे. या ठिकाणी तैनात ‘स्थिर सर्वेक्षण पथका’द्वारे प्रत्येक खासगी वाहनांची कसून तपासणी सुरू आहे.