बेअब्रू टाळण्यासाठी चौकशीचे गुऱ्हाळ
By Admin | Updated: December 8, 2015 00:06 IST2015-12-08T00:06:22+5:302015-12-08T00:06:22+5:30
चोरट्यांसह ट्रक तोडणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा ठपका असलेल्या गुन्हे शाखेशी संबंधित ‘टीप’ प्रकरणात चौकशीची गुऱ्हाळ सुरू आहे.

बेअब्रू टाळण्यासाठी चौकशीचे गुऱ्हाळ
पोलीस निरीक्षकांसह पाच जणांवर कारवाईची तलवार
गुन्हे शाखेतील टीप प्रकरण अधिवेशन संपल्यावर कारवाई !
अमरावती : चोरट्यांसह ट्रक तोडणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा ठपका असलेल्या गुन्हे शाखेशी संबंधित ‘टीप’ प्रकरणात चौकशीची गुऱ्हाळ सुरू आहे. तीन आठवड्यांनंतरही आयुक्तांनी या चौकशीबाबत ठोस भूमिका किंवा वस्तुनिष्ठ निष्कर्ष जाहीर केलेला नाही. त्यामुळे गुन्हे शाखेतील संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांना आयुक्तालयातील बडे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा चुकीचा संदेश पोलीस वर्तुळात जात आहे. संभाव्य बेअब्रु टाळण्यासाठीच चौकशीचा ‘फार्स’ सुरू असल्याची टीका आता सुरू झाली आहे.
-तर अधिवेशनात गाजणार !
वाशीम जिल्ह्यातून ११ नोव्हेंबरला पळविलेला १० चाकी ट्रक तोडण्यासाठी अमरावतीमधील नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला देण्यात आली. या ट्रकच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे एक पथक नागपुरी गेट हद्दीत असताना दुसऱ्या एका पथकाला हा ट्रक आढळला. हा ट्रक न पकडता या पथकाने त्या ट्रकला परतवाडाकडे रवाना केल्याचा आरोप आहे. वाशीम पोलीस यासंदर्भात अमरावती शहर पोलिसांशी वारंवार संपर्क साधत असल्याच्या पार्श्वभूमिवर गुन्हे शाखेतील संबंधित पथकावर आरोप झाल्याने या ‘टीप’ प्रकरणाची चौकशी आयुक्तांनी स्वत:कडे घेतली. गेल्या तीन आठवड्यात आयुक्तांनी यासंदर्भात गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. संबंधित व्यक्तींचे बयाणही नोंदविले.
या ‘गोपाळ’ काल्याला जबाबदार कोण? हे ठरविण्याइतपत आयुक्त अंतिम निवाड्यापर्यंत पोहोचले आहेत. वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे कारवाई होईल. ती मोठीच असेल असे संकेत पोलीस आयुक्तांनी वारंवार दिले आहेत. यावरुन ‘टीप’ प्रकरणातील आर्थिक देवाण-घेवाणीमध्ये कुणाचे हात ओले झालेत, हे आयुक्तांना निश्चितपणे समजले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हे शाखेचा ‘डामडौल’ बिघडला आहे. ‘टीप’ प्रकरणात अधिकारी दर्जाच्या पोलिसांची नावे समोर येत असल्याने व त्या आधारावर कारवाई केल्यास अधिवेशनाच्या तोंडावर अमरावती शहर पोलिसांची बेअबु्र होईल. स्थानिक लोकप्रतिनिधीही हा मुद्दा अधिवेशनात गाजवू शकतात, अशी भीती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सतावत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. याशिवाय चोरी गेलेल्या ट्रकची माहिती दिल्यानंतरही ‘टीप’ देऊन तो ट्रक पुढे पाठवून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपात वाशिम पोलीस गुन्हे शाखेतील ‘त्या’ पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करू शकतात, अशी भीती असल्याने अधिवेशन काळात इभ्रत जाऊ नये, म्हणून चौकशीची गुऱ्हाळे सुरू असल्याची माहिती एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
टीप’ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अंतिम निवाड्यापर्यंत अद्याप पोहोचलेलो नाही.
- राजकुमार व्हटकर,
पोलीस आयुक्त, अमरावती.