कागदोपत्री चालणाऱ्या सहकारी संस्थांवर टाच
By Admin | Updated: July 4, 2015 00:46 IST2015-07-04T00:46:17+5:302015-07-04T00:46:17+5:30
केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी आता सहकार विभागाने कडक पावले उचलली आहेत.

कागदोपत्री चालणाऱ्या सहकारी संस्थांवर टाच
सहकार विभागाचा निर्णय : १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण
जितेंद्र दखने अमरावती
केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी आता सहकार विभागाने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत थेट गावागावांत जाऊन सहकारी संस्थांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे बंद संस्थांवर टाच येणार आहे.
जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरलेले आहेत. काहीतरी उद्देश ठेवून अनेक सहकारी संस्थांची स्थापना झाली. पण उद्देश सफल झाल्यावर या संस्थांकडे संचालक व संस्थापकांनीही पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी कर्ज घेतले. मात्र कर्जाची परतफेडच करण्यात आले नाही. त्यामुळे संस्था अडचणीत आल्यात. यामध्ये पतसंस्थांचा सर्वाधिक समावेश आहे. गृहनिर्माण संस्था आणि पाणी वापर संस्था नेमक्या कुठे आहे, याचा शोध घेणेही अवघड झालेले आहे.
या सर्व परिस्थितीत सहकार विभागाकडून वारंवार सहकारी संस्थांना आॅडिट करून घेण्याच्या सूचना करूनही बऱ्याच संस्थांचे आॅडिट झालेले नाहीत, तसेच संस्था आॅनलाईन करताना अनेक संस्थांची माहितीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही संस्था केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकारी संस्थांची नेमकी स्थिती काय, याचे सर्वेक्षण प्रत्येक गावात जाऊन करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. त्यासाठी येत्या १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावांत जाऊन नोंदणी झालेल्या प्रत्येक संस्थांची माहिती घेणार आहेत. ज्या संस्था सुरू आहेत त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला जाणार आहे. ज्या संस्थांचा ठावठिकाणाच नाही अशा संस्था तातडीने बंद केल्या जाणार आहेत.
यासाठी सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी एक जुलैपासून सर्वेक्षण व शोध मोहिमेत सहभागी होणार आहेत. ज्या संस्थांचे कामकाजच सुरू नाही त्यांनी पुन्हा संस्था चालविण्याची तयारी दर्शविल्यास एकवेळ संधी दिली जाणार आहे.
या सर्वेक्षणांती आजपर्यंत कागदोपत्री सुरू असलेल्या संस्था बंद होणार असून जिल्ह्यातील सहकारी संस्थांची स्वच्छताच या मोहिमेतून होणार आहे. (प्रतिनिधी)
सर्वेक्षणातून काय
उघड होणार?
जिल्ह्यात सध्या २५४९ सहकारी संस्था असून २ हजार ३५० संस्था आॅनलाईन सुरू आहेत, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे. उर्वरित संस्था एकतर बंद किंवा कागदोपत्री असणार आहेत. त्यापैकी पाणी वापर संस्था आणि गृहनिर्माण संस्था शोधणे सहकार विभागाला अडचणीचे वाटत आहे. या सर्वेक्षणातून चांगल्या सहकारी संस्था नेमक्या किती ही माहिती उघड होणार आहे.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण येत्या १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत केले जाणार आहे. यासाठी सहकार विभागाने तयारी सुरू केली असून प्रत्येक तालुका उपनिबंधक यांना सर्वेक्षणासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. यामधून चांगल्या सहकारी संस्था व बंद असलेल्या संस्था याची खरी माहिती या सर्वेक्षणातून स्पष्ट होणार आहे.
- प्रेम राठोड,
सहायक जिल्हा उपनिबंधक, अमरावती.