सुधारित पैसेवारीसाठी पश्चिम विदर्भाला उफराटा न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 01:39 PM2019-11-06T13:39:21+5:302019-11-06T13:45:57+5:30

दहा दिवसांच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. पश्चिम विदर्भात ५ हजार ३८२ गावांमध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांच्या १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरवरील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली.

Injustice on West Vidarbha regarding crop estimate | सुधारित पैसेवारीसाठी पश्चिम विदर्भाला उफराटा न्याय

सुधारित पैसेवारीसाठी पश्चिम विदर्भाला उफराटा न्याय

Next
ठळक मुद्देबाधित खरिपाची ६० पैसेवारी परतीच्या पावसाने ५३८२ गावांत १२.२२ लाख हेक्टरमध्ये नुकसान

गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहा दिवसांच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. पश्चिम विदर्भात ५ हजार ३८२ गावांमध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांच्या १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरवरील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली. महसूल यंत्रणाद्वारे या बाधित पिकांचे सर्वेक्षण सुरू असताना विभागीय आयुक्तांनी १ नोव्हेंबरला विभागाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. ती ६० पैसे असून, यामध्ये फक्त अकोला जिल्ह्याला न्याय देण्यात आला, तर अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात वस्तुस्थिती अव्हेरली गेली आहे.
अमरावती विभागात १८ ते २८ आॅक्टोबर दरम्यान ८४.१ मिमी पाऊस पडला. ही अपेक्षित ४५ मिमी पावसाच्या तुलनेत टक्केवारी १८६.५ आहे. या परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वार, मका, धान पीक होत्याचे नव्हते झाले. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने पीक सडले. गंज्या ओल्या झाल्याने बीजांकुर फुटले. दाण्यांना बुरशी चढली. कापूस ओला झाला. सरकीला बीजांकुर फुटले. ज्वारीची कणसे जागेवर सडायला लागली आहेत. ज्वारी काळी झाल्याने प्रतवारी खराब झाली. शेतकऱ्यांसमोर समोर जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला असताना महसूल विभागाद्वारे जाहीर सुधारित पैसेवारीत मात्र खरिपाचे चित्र आॅलवेल असे मांडण्यात आल्याची शोकांतिका आहे.
सुधारित पैसेवारीमध्ये अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांत ४८ पैसेवारी जाहीर झाल्याने न्याय मिळाला. मात्र, अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ६२, वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ६१, यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांत ५८ व बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ६९ सुधारित पैसेवारी दाखविण्यात आली. अद्याप अंंतिम पैसेवारी बाकी असली तरी महसूल विभागाद्वारे वस्तुस्थिती डावलण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

पश्चिम विदर्भात खरिपाचे बाधित क्षेत्र
विभागीय आयुक्तांच्या निर्देशान्वये बाधित खरिपाचे संयुक्त सर्वेक्षण महसूल यंत्रणा २९ आॅक्टोबरपासून युद्धस्तरावर करीत आहे, मात्र, याच यंत्रणाद्वारे खरिपाची सुधारित पैसेवारी ६० दाखविण्यात आली. विभागीय आयुक्तांनी शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात १,४५,०५३ हेक्टर, अकोला ३,२३,५३५, बुलडाणा ५,१९,१९६, यवतमाळ १,०४,५५९ व वाशिम जिल्ह्यात १,२५,९३५ हेक्टरमधील पिके ३३ टक्क्यांवर बाधित झाली आहेत. तरीदेखील सुधारित पैसेवारी ६० कशी, अशा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

जिल्हानिहाय सुधारित पैसेवारी
जिल्हा                     गावे                     पैसेवारी
अमरावती                १९६१                        ६२
अकोला                   ९९०                         ४८
यवतमाळ                २०४८                     ५८
वाशिम                       ७९३                        ६१
बुलडाणा                   १४१९                       ६९
एकूण                        ७२९९                         ६०

Web Title: Injustice on West Vidarbha regarding crop estimate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी