अमानुष मारहाण... सराट्याचे चटके... तरीही चिमुकलीची आस...
By Admin | Updated: November 10, 2014 22:34 IST2014-11-10T22:34:51+5:302014-11-10T22:34:51+5:30
मुळात पती-पत्नीचे नातेच विश्वासाचे. पण, तिचे लग्नच खोट्या माहितीवर जुळलेले...तरीही तिने जुळवून घेतले...उद्याच्या सुस्वप्नांची आस घेऊन ती जगत राहिली...दैवाने पदरी एक सुंदर कन्यारत्न घातले..

अमानुष मारहाण... सराट्याचे चटके... तरीही चिमुकलीची आस...
गणेश वासनिक - अमरावती
मुळात पती-पत्नीचे नातेच विश्वासाचे. पण, तिचे लग्नच खोट्या माहितीवर जुळलेले...तरीही तिने जुळवून घेतले...उद्याच्या सुस्वप्नांची आस घेऊन ती जगत राहिली...दैवाने पदरी एक सुंदर कन्यारत्न घातले...पण तिच्या हाल-अपेष्टा काही संपल्या नाहीत..नशिबी आलेली मारहाण, उपासमार सोसताना अर्धमेली झालेली ती सध्या सासरच्या अत्याचारामुळे इर्विन रूग्णालयात उपचार घेतेय..सासरच्यांनी हिसकावून घेतलेली लाडकी लेक परत मिळवायचीच..या निश्चयासह लढते आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिंगणी (गावंडगाव) या खेडेवजा गावातील दीपमालाची कथा अंगावर शहारे आणणारी आहे. अमरावती शहरातील कमिश्नर कॉलनी येथील पंजाबराव तायवाडे यांची कन्या दीपमाला हिचा विवाह २००९ साली अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिंगणी (गावंडगाव) येथील लव्हाळे कुटंबातील विनोद नामक युवकासोबत झाला. बोलणीदरम्यान मुलाला खासगी आयुर्विमा कंपनीत नोकरी असल्याचे सांगितले गेले. मात्र, लग्नानंतर विनोदला नोकरी नसल्याचे समजले. तरीही दीपमालाने परिस्थितीशी जुळवून घेत संसार सुरू केला. कालांतराने त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र, मुलगी झाल्याने दीपमालाच्या सासरच्यांनी तिचा छळ सुरु केला. माहेरहून पैसे आणण्यासाठी दीपमालाचा छळ होऊ लागला. अनेकदा सासरच्यांची पैशांची मागणी दीपमालाने वडिलांना सांगून पूर्णही केली. परंतु तरीही कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन सतत मारहाण, टोचून बोलणे, आई- वडिलांना शिवीगाळ हा प्रकार नित्याचाच झाला होता. तरीही दीपमालाने चिमुकल्या विधिशा नामक चिमुरडीसाठी हे सर्व सहन केले. मात्र, सासरच्या मंडळींनी हळूहळू मानवतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. एक, दोन नव्हे तर चक्क आठ दिवस दीपमाला हिला उपाशी ठेवले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली.
घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी..
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड क्र. १४ मध्ये उपचार घेणाऱ्या दीपमाला लव्हाळे हिचे पूर्ण लक्ष चार वर्षांच्या चिमुरड्या विधीशाकडे लागले आहे. विधीशा हिला तिच्यापासून दूर करण्यासाठी सासरची मंडळी षडयंत्र रचत असली तरी विधिशाला स्वत:पासून कधीही दूर होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार दीपमालाने केला आहे. मुलीला मिळविण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयाच्या पायऱ्या चढण्याचीदेखील तिची तयारी आहे.
पोलीस आयुक्तांकडून न्यायाची अपेक्षा
सासरच्या लोकांनी आठ दिवस उपाशी ठेवले. सतत मारहाण केली. त्यानंतर वाहनाने माहेरी आणून अक्षरश: फेकून दिले. ही अतिशय गंभीर बाब असतानादेखील आतापर्यंत फ्रेजरपुरा पोलिसांनी दीपमाला हिला अमानुष मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले नाही. पोलीस केवळ कागदी घोडे नाचवित असून तिला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न दीपमाला हिच्या माहेरच्यांनी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांना केला आहे.