दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा रिपाइंतर्फे निषेध
By Admin | Updated: October 25, 2014 02:07 IST2014-10-25T02:07:00+5:302014-10-25T02:07:00+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एका दलित कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या करण्यात आली. मात्र अद्यापर्यत आरोपींना अटक करण्यात आली ...

दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा रिपाइंतर्फे निषेध
अमरावती : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एका दलित कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या करण्यात आली. मात्र अद्यापर्यत आरोपींना अटक करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रिपाइंच्या वतीने तिहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. निदर्शकांनी आरोपींना तत्काळ अटकेची मागणी केली.
रिपाइं (गवई गट) चे जिल्हा संघटक अमोल इंगळे यांच्या नेतृत्वात अहमदनगर जिल्ह्यातील तिहेरी हत्यकांडाचा निषेध नोंदवल्या गेला. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा तसेच सोनई येथे दलित तरुणांच्या हत्याकांडाच्या घटना ताज्या असताना पाथर्डी येथील जवखेडे गावच्या दलित समाजातील जाधव कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांडाचे प्रकरण उघडकीस आले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलित समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना काळीमा फासणाऱ्या असल्याचा आरोप अमोल इंगळे यांनी केला. राज्यात सरकार अस्तिवात आले नाही. त्यामुळे राज्यपाल आणि राज्याचे मुख्य सचिवांनी जवखेडा या गावाला भेट दिली नाही. तिहेरी हत्याकांडाने राज्यात दलित समाज दहशतीत वावरत असून पोलिसांनी आरोपींना अटक करुन जाधव कुटूंबियांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे. तिहेरी हत्याकांडाचे आरोपी फरार असल्याच्या निषेधार्थ मशाल पेटवून पोलीस प्रशासनाला इशारा देण्यात आला. जिल्ह्यधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी अमोल इंगळे, उमेश इंगळे, मनोज थोरात, स्वप्नील इंगोले, प्रवीण सरोदे, संदीप गजभिये, आकाश वानखडे, अमित सोनवणे, सतीश पडघण, सागर काळे, मनीष पानतावणे, सुधीर इंगळे, मच्छींदर भगत आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)