घरी नेलेले पार्थिव पुन्हा आणले इर्विनमध्ये

By Admin | Updated: September 23, 2015 00:15 IST2015-09-23T00:15:19+5:302015-09-23T00:15:19+5:30

विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मरण पावलेल्या युवतीचा मृतदेह इर्विन रुग्णालयातून घरी नेण्यात आला.

Inhabitants moved home again | घरी नेलेले पार्थिव पुन्हा आणले इर्विनमध्ये

घरी नेलेले पार्थिव पुन्हा आणले इर्विनमध्ये

शॉक लागून युवतीचा मृत्यू : पोलिसांनी करून घेतले शवविच्छेदन
अमरावती : विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मरण पावलेल्या युवतीचा मृतदेह इर्विन रुग्णालयातून घरी नेण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पुन्हा इर्विनला आणला. ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत रामपुरी कॅम्प परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. कोमल दिलीप फुलवानी (१७) असे मृत युवतीचे नाव आहे.
रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी कोमलला घरात विद्युत प्रवाहाचा झटका बसला. कुटुंबीयांनी तिला तत्काळ उपचाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी कोमलला मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह परत घरी नेला. याची दखल जिल्हा सामान्य रूग्णालयातही घेण्यात आली नाही. कोमलच्या मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली होती. त्यामुळे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली.
गाडगेनगर पोलिसांना देखील घटनेची कुणकुण लागली. विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मरण पावलेल्या व्यक्तिचे शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने पोलिसांनी तत्काळ मृत कोमल हिचे घर गाठले. नातेवाईकांची समजूत घालून रात्रीला मृतदेह पुन्हा शवविच्छेदनाकरिता इर्विनमध्ये आणला. मंगळवारी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी सजगता दाखवून स्थिती हाताळली व तरूणीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन पार पडले. (प्रतिनिधी)

नातेवाईकांनी इर्विनमधून मृतदेह परस्पर घरी नेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृताच्या घरी जाऊन नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर मृतदेह इर्विनमध्ये पुन्हा शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
- के.एम.पुंडकर,
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे.

Web Title: Inhabitants moved home again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.