माहिती अधिकाऱ्याने केली अर्जदाराची दिशाभूल
By Admin | Updated: June 5, 2015 00:35 IST2015-06-05T00:35:32+5:302015-06-05T00:35:32+5:30
के.के. लॉनसंंदर्भात अचलपूर नगर पालिकेचे कनिष्ठ अभियंता तथा जनमाहिती अधिकाऱ्यांनी अर्जदारास चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याने

माहिती अधिकाऱ्याने केली अर्जदाराची दिशाभूल
तीन दिवसांचा अल्टिमेटम : अचलपूर पालिकेतील प्रकार
सुनील देशपांडे अचलपूर
के.के. लॉनसंंदर्भात अचलपूर नगर पालिकेचे कनिष्ठ अभियंता तथा जनमाहिती अधिकाऱ्यांनी अर्जदारास चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याने अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरुन अपीलकर्त्याला तीन दिवसांच्या आत स्वखर्चाने अपेक्षित माहिती द्यावी, असा निर्णय दिला. त्यानंतरही पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अपिलकर्त्याला माहिती न मिळाल्याने त्यांनी पुन्हा मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दिला आहे.
अचलपूर येथील बिलनपुरा भागात ‘के.के.लॉन’ नावाने मंगल कार्यालय आहे. येथे विवाह समारंभ व विविध कार्यक्रम पार पडतात. या लॉनमधील उरलेले अन्न रस्त्यावर टाकले जाते. कार्यक्रमादरम्यान वाहतुकीची कोंडी तर होतेच; पण आपल्या घरापर्यंत ये-जा करताना भयंकर त्रास होतो. यावर प्रतिबंध लावण्यासाठी कारवाई करावी, अशी तक्रार गेल्यावर्षी मनीष लाडोळे, गणेश पोटे, राजू पोटे, गोपाळ आवनकर, गणेश बिखार, अभिजित मानकर, अरुण रेखाते, प्रभाकर थोरात, विलास थोरात, देवीदास इंगोले, उमेश पोळे, यांच्यासह आदी रहिवाशांनी नगर परिषदेचे मुख्याध्याधिकारी धनंजय जावळीकर यांच्याकडे केली होती. त्यांनी लॉनचे मालक खान यांना यासंदर्भात नोटीसही बजावली होती.
बिलनपुऱ्यातील रहिवासी मनीष ऊर्फ छोटू लाडोळे यांनी नगरपालिकेत ५ जानेवारी २०१५ रोजी प्रथम माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करुन के.के. लॉन या नावाने प्रचलित असलेल्या मंगल कार्यालयात पार्किंगसाठी जागा मंजूर नकाशात तरतूद आहे किंवा नाही, याबाबत विचारणा केली होती. तसेच मंगल कार्यालयास परवानगी देताना पाळावयाच्या अटी व शर्तींबाबत माहिती अपेक्षिली होती. या अर्जास प्रतिसाद देऊन जनमाहिती अधिकारी शशी तायडे यांनी २३ जानेवारी २०१५ रोजी पत्र पाठवून विषयांकित बांधकामाच्या जागेच्या मालकाचे नाव तसेच जागेचा शिट नं.,प्लॉट क्रमांकाचा अर्जात उल्लेख नसल्याने माहिती देण्यास असमर्थता व्यक्त करुन २०१४-१५ या वर्षात के.के. लॉन या नावाने कोणतीही बांधकाम परवानगी दिली नसल्याचे कळविले होते.
लाडोळे यांनी या विषयाबाबत जनमाहिती अधिकारी यांच्याकडे ३ फेब्रुवारी २०१५ रोजी दुसरा अर्ज सादर करुन जनमाहिती अधिकाऱ्यांना अपेक्षित मालक प्लॉट नं. शिट नं. यांचा उल्लेख करुन माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. यात त्यांना बांधकामाचे प्रारंभपत्राची प्रत देण्यात आली. यात छोटू लाडोळे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अपिलीय अधिकाऱ्याकडे अपिल दाखल केल्यावर २५ मे २०१५ रोजी निर्णय देण्यात आला की, अपिलकर्ता सर्वसामान्य व्यक्ती असल्याने व तांत्रिक माहितीची अपेक्षा नसल्याने जनमाहिती अधिकाऱ्याने प्रथम अर्जावरच योग्य माहिती अपिलकर्त्याला देणे अपेक्षित होते. अपिलकर्त्याने पुनश्च ३ फेब्रुवारी २०१५ रोजी दुसरा अर्ज केल्यावर जनमाहिती अधिकाऱ्यांनी पूर्ण एक महिन्याचा वेळ घेऊन पूर्ण माहिती दिली नाही. वास्तविक पाहता जनमाहिती अधिकारी यांनी अपिलकर्त्यास बांधकामाच्या मंजूर नकाशाची प्रत व विकास नियंत्रण नियमावली जी मंगल कार्यालयाशी संंबंधित असेल ती देणे अपेक्षित आहे. पण ती जनमाहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही, असे अपिल क्रमांक ४३/१४३७/२०१५ च्या निकालपत्रात नमूद केले आहे. जनमाहिती अधिकारी आर.एन. तायडे यांनी हा निर्णय झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांत स्वखर्चाने अपिलकर्त्यास अपेक्षित आवश्यक माहिती स्वखर्चाने अपिलकर्त्यास द्यावी, असा निर्णय दिला. लाडोळे, कनिष्ठ अभियंता तथा माहिती अधिकारी तायडे यांना समोरासमोर बोलावून दोघांच्या बाजू मुख्याधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. निर्णयाला ५ दिवस उलटल्यानंतरही अपेक्षित माहिती न दिल्याने लाडोळे यांनी १ जून रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यात तायडे माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले आहे.