महागाईने तेल ओतले, घरातले बजेट बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:18+5:302021-09-09T04:17:18+5:30
परतवाडा : कोरोनाकाळात कधी कडक लॉकडाऊन, तर कधी काहीसा दिलासा या उघडझापमध्ये वाढत्या महागाईने स्वयंपाकघरातील खर्च जवळपास दीडपट वाढला ...

महागाईने तेल ओतले, घरातले बजेट बिघडले
परतवाडा : कोरोनाकाळात कधी कडक लॉकडाऊन, तर कधी काहीसा दिलासा या उघडझापमध्ये वाढत्या महागाईने स्वयंपाकघरातील खर्च जवळपास दीडपट वाढला आहे. तीन ते पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला याचा जबर फटका बसला आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. डिझेल शंभरीच्या जवळपास आहे, तर खाद्यतेलाने महागाईच्या सीमा ओलांडल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. तुरीच्या डाळीचे वरण रोजच्या जेवणातून हद्दपार झाले आहे.
वाढलेला खर्च रुपयात
1) खाद्यतेल ३० रुपयांनी किलोमागे वाढले आहे
2) धान्य १५ रुपयांनी किलोमागे वाढले आहे
3) साखर ५ रुपयांनी किलोमागे वाढली आहे
4) साबुदाणा १५ रुपयांनी किलोमागे वाढला आहे
5) चहा पुडा किलोमागे १० रुपयांनी वाढला आहे
6) डाळ किलोमागे २० रुपयांनी वाढली आहे
7) गॅस सिलिंडर ३५० रुपयांनी वाढले आहे
8) पेट्रोल २० रुपयांनी लिटरमागे वाढले आहे
9) डिझेल १५ रुपयांनी वाढले आहे
एकूण एकूण खर्च किलोमागे ४५० रुपयांनी वाढला आहे. यात तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा खर्च महिन्याला १५०० रुपयांनी वाढला आहे.
डाळीशिवाय वरण
जेवणात तुरीच्या डाळीच्या वरणाला अधिक प्राधान्य दिले जाते. पण चांगल्या प्रतीच्या तूर डाळीचे भाव २० रुपयांनी वाढल्यामुळे ही तुरीची डाळ रोजच्या जेवणातून हद्दपार झाली. अन्य डाळीही महाग आहेत. डाळींचे वाढलेले भाव आवाक्याबाहेर असल्यामुळे डाळीशिवाय वरण शिजवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. वरण शिजले, तर त्यात डाळ कमी आणि पाणीच अधिक बघायला मिळते
** अशी वाढली महागाई---
प्रति किलोचा-- सध्याचा दर जानेवारीतील दर
शेंगदाणा तेल - १६५ रुपये. १४० रुपये
सोयाबीन तेल-- १६० रुपये. ११० रुपये
शेंगदाणे. १२० रुपये. १०० रुपये
साखर. ४० रुपये. ३५रुपये
साबुदाणा. ७० रुपये. ५५ रुपये
मसाले. वाढ नाही. ------
चहा पुडा. ४८० रुपये. ४७० रुपये
तूर डाळ. १०० रुपये. ८५ रुपये
मुग डाळ. ९५ रुपये. ८० रुपये
उडीद डाळ. ९५ रुपये. ८५रुपये
हरभरा डाळ. ७२ रुपये. ६५ रुपये
पेट्रोल. १०८ रुपये. ८८ रुपये
डिझेल. ९५ रुपये ५३ पैसे ८० रुपये
सिलिंडर हजाराच्या घरात
दिवसागणिक गॅस सिलिंडरचे भाव वाढत आहेत. काही महिन्यांपूर्वी ६०० रुपयांना मिळणारे सिलिंडर नऊशे रुपयापर्यंत पोहोचले आहे. वरून घरपोच डिलिव्हरीकरिता पोहोचविणारा वीस ते पंचवीस रुपये एक सिलिंडरमागे अधिक येतो. सिलिंडर हजारांच्या घरातच पोहोचल्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करायचा का, असा प्रश्न उभा ठाकला आहे. पण, चूल पेटविण्याकरिता इंधन कुठून आणायचे आणि फ्लॅटमध्येही चूल पेटवायच्या का, या विवंचनेत गृहिणींंसह कुटुंबप्रमुख अटकले आहेत.
ृृ------------------------
गृहिणी म्हणतात
वाढत्या महागाईने कुटुंबाचे बजेट विस्कळीत झाले आहे. यातच कोरोना, डेंग्यू, मलेरियासह व्हायरल आजाराने औषधांचाही खर्च वाढला आहे.
- वैशाली विनोद इंगोले, गृहिणी, परतवाडा
--------------
कोरोना आणि लॉकडाऊन यात व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाले. लहान व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. यातच वाढत्या महागाईच्या मार आणि व्हायरल आजारांसह डेंग्यूसारख्या हजाराने खर्च वाढले आहेत. वाढत्या महागाई काहीही सुचेनासे झाले आहे. अनेक खर्चांवर मर्यादा आल्या आहेत. आवडी-निवडी दूर ठेवाव्या लागत आहेत.
- रूपल मनोज अग्रवाल, गृहिणी, परतवाडा