कपाशीवर शेंदरी अळीचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: October 19, 2016 00:21 IST2016-10-19T00:21:50+5:302016-10-19T00:21:50+5:30
जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. रेफ्यूज कपाशीची पेरणी न केल्यामुळे..

कपाशीवर शेंदरी अळीचा प्रादुर्भाव
नवे संकट : जिल्ह्यात एक लाख ८१ हेक्टरमध्ये कपाशीचे पीक
अमरावती : जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. रेफ्यूज कपाशीची पेरणी न केल्यामुळे हे संकट ओढावले असल्याचा कृषितज्ञांचा अंदाज आहे. वेळीच व्यवस्थापन न केल्यस सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर कमी येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार ३९२ हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. यंदा पेरणीपासून कपाशीला पोषक असा पाऊस असल्याने कपाशीचे पीक चांगले आहे. सलग महिनाभर असलेल्या परतीच्या पावसाने कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला. सतत पाऊस, ढगाळ वातावरण, सूर्य प्रकाशाचा अभाव, वातावरणात व जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला.
या प्रतिकूल वातावरणामुळे कपाशीची पाने व बोंडाची गळ होत आहे. तसेच कपाशीवर पुन्हा लाल्याचे संकट ओढविले आहे. काही ठिकाणी कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. या किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अन्यथा सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
यामुळे होतो बोंडअळीचा प्रादुर्भाव
कपाशीसोबत खाद्यपिकांची उपलब्धता असते. अधिकच्या उत्पादनासाठी कपाशीच्या हंगामाचा कालावधी वाढविल्याने किडीत खाद्यान्नाची सातत्याने उपलब्धता होणे, बीटी जनुक विरहित कपाशीच्या आश्रित ओळी न लावल्यामुळे बीटी प्रथिनांविरोधात प्रतिकार क्षमता तयार होणे तसेच बीटीवर बोंडअळीच्या नियंत्रणासाठी वेळीच व्यवस्थापन न केल्यामुळे किडींच्या संख्येत वाढ होणे, कपाशीवर फवारणी केल्यामुळे ताज्या हिरव्या पानांची वाढ होऊन बोंडाची वाढ कमी होणे व अशा किटकनाशकांची एकत्रित फवारणी केल्यामुळे हिरव्या व फुटलेल्या बोंडामध्ये दुसऱ्या वेचणीत शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येतो.
-तर मोठ्या प्रमाणावर
नुकसानीची शक्यता
या अळ्या सुरूवातीला पाने, कळ्या व फुलावर उपजिविका करतात. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखे दिसतात. अशा कळींना डोमकळ्या म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाने, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात, अळी बोंडातील बिया खाते त्याचबरोबर रुई कात्री करून नुकसान करते. यामुळे रुईची पत खालावते. तसेच सरकीमधील तेलाचे प्रमाण कमी होते.