‘हॉटस्पॉट’बाहेर झाला शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:00 AM2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:01:05+5:30

जिल्ह्यात एका आठवड्यात ५० वर नागरिक कोरोना संक्रमित झाले आहेत. यामध्ये नव्याने काही भागात रुग्ण आढळत असताना, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आरोग्य यंत्रणेला मिळालेली नाही. किंबहुना शहरात कोरोनाचा शिरकाव झाला कुठून, हे शोधण्यात महिन्याभरानंतरही प्रशासनाला अपयश आले आहे. २ एप्रिलला होम डेथ झालेल्या हाथीपुऱ्यातील ४८ वर्षीय आर्मेचर मेकॅनिकची कुठलीही टॅव्हल हिस्ट्री नाही.

Infiltration outside the 'hotspot' | ‘हॉटस्पॉट’बाहेर झाला शिरकाव

‘हॉटस्पॉट’बाहेर झाला शिरकाव

Next
ठळक मुद्देकोरोनाबाधित ७० : मृतांची संख्या ११, कोरोनामुक्त ५, ५४ वर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील क्लस्टर झोनव्यतिरिक्तही कोरोना पाय पसरू लागला आहे. नव्या आठ ठिकाणी कोरोना संक्रमित आढळल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. शहरात सहा नवे कंटेनमेंट व जिल्हा ग्रामीणमध्ये आता दोन ठिकाणी बफर झोन जाहीर करण्यात आल्याने यंत्रणेवरचा ताणही वाढला आहे.
जिल्ह्यात एका आठवड्यात ५० वर नागरिक कोरोना संक्रमित झाले आहेत. यामध्ये नव्याने काही भागात रुग्ण आढळत असताना, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आरोग्य यंत्रणेला मिळालेली नाही. किंबहुना शहरात कोरोनाचा शिरकाव झाला कुठून, हे शोधण्यात महिन्याभरानंतरही प्रशासनाला अपयश आले आहे. २ एप्रिलला होम डेथ झालेल्या हाथीपुऱ्यातील ४८ वर्षीय आर्मेचर मेकॅनिकची कुठलीही टॅव्हल हिस्ट्री नाही. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ३१ दिवसांत नवा रुग्ण आढळलेला नसल्याने या भागात कोरोनाची साखळी तुटली. मात्र, इतर भागात कोरोना झपाट्याने वाढू लागलेला आहे. बुधवारी एका संक्रमित महिलेचा मृत्यू झाल्याने मृत बाधितांची संख्या ११ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या आता ७० झाली आहे.
शहरात सद्यस्थितीत ताजनगरला ८, हनुमाननगर ६ व खोलापुरी गेट ९ तसेच अमरावती तालुक्यात शिराळा येथे ५ रुग्ण आढळल्याने हा भाग आता ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनला आहे. क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये नियमांचे उल्लंघन होत असताना पोलीस याबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे कोरोनाची साखळी ब्रेक होणार कशी, असा अमरावतीकरांचा सवाल आहे.

एसआरपीएफ केव्हा?
शहरात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांची मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एक आठवड्यापूर्वी केली. मात्र, हिंगोली, मालेगाव आदी ठिकाणी बंदोबस्तावरील एसआरपीएफचे जवान संक्रमित झाल्याने संपूर्ण तुकडी क्वारंटाइन करण्यात आलेली आहे. परिणामी जिल्ह्यात ही अतिरिक्त सुरक्षा मिळणे कठीण झाल्याने शहरात स्थानिक पोलिसांच्या बळावरच कठोर निर्बंध अंमलात आणावे लागणार आहेत.

शहरात नव्या भागात संक्रमण; चिंता वाढली
शहरातील आधीच्या बफर झोनबाहेरही आता कोरोना संक्रमण वाढले आहे. बडनेरात जुनी वस्ती व नव्या वस्तीत कुरेशीनगर, अमरावतीमध्ये कंवरनगर, मसानगंज, जुना कॉटन मार्केट व हबीबनगर या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाला. अशीच स्थिती कायम राहिल्यास शहरात समूह संक्रमण होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

वलगाव पोलीसकरतात तरी काय?
वलगाव ठाण्याच्या हद्दीत शिराळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू होता व यामधूनच कोरोनाचा शिरकाव झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. किंबहुना जिल्हाधिकाऱ्यांकडे याविषयी तक्रारदेखील झालेली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील या गावामध्ये जुगाराला कुणाचे पाठबळ होते, याचा शोध घ्यायला हवा. अशा स्थितीत गावागावांत ‘कोरोना हॉटस्पॉट’ तयार होण्याची भीती निर्माण झालेली आहे.


प्रशासन माहिती दडवते का?
वरूडमध्ये महसूल प्रशासनातील एका अधिकाऱ्याच्या वाहनचालकाच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला व त्यानंतर क्वारंटाइन करण्यात आलेल्या त्यांच्या मुलाचा निगेटिव्ह, तर दोन मुलींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे या वाहनचालकाच्या दैनंदिन संपर्कातील अधिकारी व त्यांच्या संपर्कात असलेले अन्य अधिकारी सेल्फ क्वारंटाइन झालेत. या अधिकाऱ्यांच्या स्वॅबचे अहवाल काय आहेत, ही माहिती जाहीर करणे महत्त्वाची असताना प्रशासन ती दडवित असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Infiltration outside the 'hotspot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.