उपमहापौरांच्या प्रभागात ‘कोरोना’चा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:47+5:30
मसानगंज परिसरात चेतनदास बगीचा भागातील एका ७४ वर्षीय वृद्धास दोन दिवसांपूर्वी येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्रावाचा अहवाल तपासणीला पाठविला होता. तो बुधवारी दुपारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींना आयसोलेशन क्वारंटाइन करण्यात आले आहे.

उपमहापौरांच्या प्रभागात ‘कोरोना’चा शिरकाव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कंटेनमेंट झोनच्या बाहेरही आता कोरोना पाय फैलावू लागला आहे. उपमहापौर कुसुम साहू व माजी महापौर संजय नरवणे यांच्या मसानगंज प्रभागात ७४ वर्षीय वृद्ध बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २८ वर पोहोचली आहे.
मसानगंज परिसरात चेतनदास बगीचा भागातील एका ७४ वर्षीय वृद्धास दोन दिवसांपूर्वी येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्रावाचा अहवाल तपासणीला पाठविला होता. तो बुधवारी दुपारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींना आयसोलेशन क्वारंटाइन करण्यात आले आहे.
बाधितांच्या घराकडे जाणारे सर्व मार्र्ग सील केले असून, या भागात आरोग्य पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. सॅनिटायझर फवारणी करण्यात आलेली आहे. या कोरोनाग्रस्तांची ट्रॅव्हल हिस्ट्री आरोग्य विभागाद्वारे घेण्यात येत आहे. शहरात अमरावतीत एकूण २८ कोरोनाग्रस्तांपैकी सात दगावले. चार कोरोनामुक्त झाले. १७ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी चेतनदास बगीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे.
नागपूर, अकोल्यानंतर सेवाग्रामलाही अहवाल तपासणी
अमरावती येथील संशयित रुग्णांच्या घशातील स्रावांचे अहवाल तपासणीसाठी नागपूरच्या ‘एम्स’मध्ये पाठविले जातात. या ठिकाणी अतिरिक्त ताण वाढल्याने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाच दिवसांपासून नमुने तपासणीला पाठविण्यात येत आहे. लवकर अहवाल मिळावेत, यासाठी आता सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत बुधवारपासून नमुने पाठविले जात आहेत. अमरावती येथील पीडीएमसी प्रयोगशाळेतील नमुने अहवाल ‘एम्स’सोबत मॅच झाल्याने एक, दोन दिवसात नमुने तपासणीला मंजुरी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 'लोकमत'ला सांगितले.