Infection of salivary disease on cotton, peppermint | कपाशीवर लाल्या रोगाची लागण, मिरचीवर करपा

कपाशीवर लाल्या रोगाची लागण, मिरचीवर करपा

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली : पंचनामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, तर मिरचीवर करपा जाणवू लागल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा सततच्या संकटांतून सावरण्यास निसर्गाने शेतकऱ्यांना वेळच दिलेला नाही. कृषी विभागाने रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
गेल्या दोन वर्षांत कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसत आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली अन् आता दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे. मिरचीची रोपेही करपू लागली आहेत. नगदी पीक असलेली कपाशी दुरून हिरवी दिसत असली तरी लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. मिरचीवर करपा व ज्वारीवर चिकट्या (मावा) चा प्रादुर्भाव झाला, तर तुरीची झाडेही करपत असल्याने यावर्षी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्यात चार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. हातात दमडी शिल्लक नसतानादेखील मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. अनेकांनी कमी खर्चाचे पीक म्हणून सोयाबीनसह तूर , उडीद, मूग, मिरची, ज्वारीची सुद्धा पेरणी मोठ्या प्रमाणात केली. परंतु, मध्येच दीड महिना पावसाने संताधार लावल्यामुळे ज्वारी, उडीद, मिरची, कपाशी, तूर, सोयाबीनसह अन्य पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद काढणीसाठी आले तेव्हा पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने लागलेल्या शेंगांना व ज्वारीला कोंब फुटले आणि सोयाबीन, ज्वारीचे दाणे काळे झाले. काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात रोटाव्हेटर फिरवावे लागले. आता शेतकऱ्यांच्या आशा कपाशी आणि तुरीवर केंद्रित झाल्या असताना, फूल व बोंडांवर रस शोषण करणाºया किडींचा प्रादुर्भाव झाला. कापसावर लाल्या रोगाने प्रहार केला. यापासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकºयांनी तीन ते पाच वेळा महागडी औषधे फवारली. तरीही पात्या, बोंडे कमी प्रमाणात लागल्याने कपाशीच्या बोंडाचे प्रमाणही घटू लागले. यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला आहे.

Web Title: Infection of salivary disease on cotton, peppermint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.