अॅम्बुुुलन्स न पोहोचल्याने गर्भातच दगावले अर्भक
By Admin | Updated: October 14, 2016 01:04 IST2016-10-14T01:04:12+5:302016-10-14T01:04:12+5:30
प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, डिझेलअभावी रूग्णवाहिका पोहोचू शकली नाही.

अॅम्बुुुलन्स न पोहोचल्याने गर्भातच दगावले अर्भक
वरुड : प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, डिझेलअभावी रूग्णवाहिका पोहोचू शकली नाही. अखेरीस रूग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत गर्भवती महिलेच्या पोटातच अर्भक दगावले. ही दुर्देवी घटना तालुक्यातील पुसला प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत १० आॅक्टोबर रोजी घडली.
कारली या सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावातील इंदिरा भारत चौधरी (२३) या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने पुसला प्राथमिक स्वास्थ्य केंद्रातून रूग्णवाहिका बोलावण्याकरिता गावकऱ्यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. विजय श्रीराव यांनी संबंधित आरोग्य केंद्राशी संपर्क साधला असता डिझेलअभावी रूग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याचे सांगण्यात आले. या आरोेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी राहुल भुतडा १५ दिवसांपासून सुटीवर आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी रजेवर जाण्यापूर्वी त्यांचा प्रभार अन्य सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दिलेला नाही.
२५ कि.मी.वरून मागविले वाहन
वरुड : रूग्णवाहिकेच्या मेंटेनन्सचा प्रश्न उभा ठाकला आहे. अखेर कारला येथून २५ कि.मी अंतरावरील जामगांवातून खासगी वाहन घेऊन प्रसूती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला पहाटे पाच वाजताच्या दरम्यान पुसला येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, येथे डॉक्टर आणि सुविधांचा अभाव असल्याने तिला वरूडला पाठविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावतीला हलविण्याचा सल्ला दिला गेला. मात्र, प्रकृती क्षणाक्षणाला ढासळत असल्याचे पाहून तिला अमरावतीला न नेता वरूड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची प्रसूती करण्यात आली. मात्र, तोवर गर्भातील बाळ पोटातच दगावले होते. तूर्तास गर्भवती महिलेची प्रकृती स्थिर असली तरी आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे तिला जन्मापूर्वीच अपत्य गमवावे लागले. सुटीवर जाताना वैद्यकीय अधिकारी राहुल भुतडा यांनी अन्य सहायक अधिकाऱ्याकडे प्रभार सोपवून जाणे आवश्यक होते. परंतु कोणावरही जबाबदारी न सोपविता ते सुटीवर निघून गेल्याने या आरोेग्य केंद्रातील एकूणच कारभार ढेपाळला आहे. या घटनेनंतर बीडीओ सुभाष भोपते, पीएमओ अमोल देशमुख यांनी बुधवारी कारली गावात पोहोचून चौकशी सुरु केली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने अद्यापही या घटनेबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याने तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.