पायदळ पेट्रोलिंगने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 00:59 IST2016-02-07T00:59:36+5:302016-02-07T00:59:36+5:30
पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्या आदेशाने सुरू झालेल्या पोलिसांच्या पायदळ पेट्रोलिंगमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

पायदळ पेट्रोलिंगने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास
अंकुश : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर फौजदारी
अमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्या आदेशाने सुरू झालेल्या पोलिसांच्या पायदळ पेट्रोलिंगमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. पायदळ गस्तीदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जात असल्यामुळे अतिक्रमणावरही वचक बसत आहे. त्यातच पोलीस रस्त्यावर फिरताना दिसून येत असल्यामुळे नागरिकांमध्येही सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होत आहे.
पोलीस आयुक्तांनी सिस्टिमॅटिक पोलिसिंग सुरू केल्यामुळे गुन्हेगारीवर निश्चितच वचक बसणार आहे. त्यातच कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशा सूचना दिल्या. सूचनेनुसार पोलिसांनी पायदळ पेट्रोलिंग सुरू केल्यामुळे अवैध प्रकार व अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यास मदत होत आहे.
या ठिकाणी झाल्यात कारवाया
शुक्रवारी फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीत पायदळ पेट्रोलिंगदरम्यान चालक मनोज दादाराव वानखडे (३२, रा.बिच्छुटेकडी) यांच्या वाहन एमएच २७-एक्स ५६९४ वर भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला. शुक्रवार बाजार येथे सय्यद जाहीद सय्यद हबीब यांचे वाहन एमएच २७३७-बी-१६७७ रस्त्यावर उभे असल्याने कारवाई करण्यात आली. नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत शासकीय विद्यानिकेतनजवळ प्लास्टिकचे साहित्य विक्री करताना अब्दुल फारूक अब्दूल रशिक याच्यावर कारवाई झाली. त्याचप्रमाणे इतवारा चौकात मनोज नंदलाल बरसैय्या यांच्या प्रतिष्ठानासमोरील मार्गावर दुकानातील साहित्य आढळून आले आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हातगाडी चालक नीलेश अंबादास सोळंकेविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.