अमरावती 'रेड झोन'मध्ये समाविष्ट होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:01:09+5:30

शुक्रवारी आढळून आलेले कोरोनाग्रस्त हैदरपुरा, पाटीपुरा, कमेला ग्राऊंड, तारखेडा या भागातील आहेत. त्यात एक पुरुष आणि पाच महिला आहेत. एका कोरोनाग्रस्त महिलेचा घरीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी संबंधित परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. टाळेबंदीचे नियम कठोरपणे अंमलात आणले जात आहेत. प्रशासनाची कठोर भूमिका आता शहरभर लागू झाल्याचे दिसेल.

Indications of Amravati joining 'Red Zone' | अमरावती 'रेड झोन'मध्ये समाविष्ट होण्याचे संकेत

अमरावती 'रेड झोन'मध्ये समाविष्ट होण्याचे संकेत

ठळक मुद्देएकूण कोरानाग्रस्त १४ : कमेला ग्राऊंड, तारखेडा, हैदरपुरा, पाटीपुरा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात गुरुवारी कोरोना चाचणीचे आणखी सहा नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १४ झाली आहे. कोरानाग्रस्तांच्या संख्येचा वेगाने वाढणारा आलेख आता चिंतेची बाब ठरला आहे. पुन्हा एक कोरानाग्रस्त आढळल्यास अमरावती जिल्हा हा शासनाच्या 'रेड झोन' यादीत समविष्ट होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी आढळून आलेले कोरोनाग्रस्त हैदरपुरा, पाटीपुरा, कमेला ग्राऊंड, तारखेडा या भागातील आहेत. त्यात एक पुरुष आणि पाच महिला आहेत. एका कोरोनाग्रस्त महिलेचा घरीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी संबंधित परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. टाळेबंदीचे नियम कठोरपणे अंमलात आणले जात आहेत. प्रशासनाची कठोर भूमिका आता शहरभर लागू झाल्याचे दिसेल.
पहाटेच्या अहवालात दोन पॉझिटिव्ह
येथील क्लस्टर झोनमध्ये ९५ वर्षीय वृद्ध महिलेसह २० वर्षीय युवकाची कोराना चाचणी गुरुवारी मध्यरात्रीनंतर पॉझिटिव्ह आली. २२ तारखेला पाटीपुऱ्यात नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितलेल्या वृद्ध महिलेच्या घशातील स्रावाचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या महिलेच्या संपर्कातील सात व्यक्तींना कोविड रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेले आहे. या सर्व व्यक्तींचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. दुसरा पॉझिटिव्ह अहवाल कोविड रुग्णालयात आयसोलेशन क्वारंटाइन असलेल्या २२ वर्षीय युवकाचा आहे. त्याला आता दुसºया माळ्यावरील कोरोनाग्रस्तांच्या कक्षात हलविण्यात आलेले आहे. २१ तारखेला घरी मृत झालेल्या व अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या ६० वर्षीय महिलेचा हा युवक नातू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सायंकाळी चार पॉझिटिव्ह
सायंकाळी पाचच्या सुमारास चार महिलांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे प्रयोगशाळेतून कळविण्यात आले. त्यातील तारखेडा येथील एका महिलेची २३ एप्रिलला 'होम डेथ' झालेली आहे. उर्वरित तीन महिला कमेला ग्राऊंड परिसरातील आहेत. त्याच परिसरातील एका महिलेचे २० एप्रिलला निधन झाले. सदर तिन्ही पॉझिटिव्ह महिला त्या मृत महिलेच्या संपर्कातील होत. पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झलेल्या महिलांचे वय ४०, ३५ आणि २० वर्षे असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
अमरावती : जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्र वारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी उपस्थित होते. मात्र, या बैठकीचा तपशील कळू शकला नाही.

कोरोना विषाणू संसर्ग प्रत्येकाला होऊ शकतो. लोकेशननुसार उद्रेकाच्या ठिकाणी प्रशासनाद्वारे उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे. प्रशासनाला सहकार्य करावे. कोणी आजारी असल्यास माहिती द्यावी.
- शैलेश नवाल
जिल्हाधिकारी

Web Title: Indications of Amravati joining 'Red Zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.