अमरावतीत फडकला स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचा ध्वज
By Admin | Updated: May 2, 2015 00:18 IST2015-05-02T00:18:55+5:302015-05-02T00:18:55+5:30
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनी स्थानिक इर्विन चौकात ‘स्वतंत्र विदर्भा’चा ध्वज फडकला.

अमरावतीत फडकला स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचा ध्वज
‘विदर्भ माझा’चा पुढाकार : इर्विन चौकातून सुरूवात
अमरावती : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनी स्थानिक इर्विन चौकात ‘स्वतंत्र विदर्भा’चा ध्वज फडकला. ‘विदर्भ माझा’च्या वतीने महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. इर्विन चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरूंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शुक्रवारी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.
‘स्वतंत्र विदर्भ, सक्षम विदर्भ, विदर्भराज्य झालेच पाहिजे, हर घर का नारा, विदर्भ हमारा’ अशा घोषणांनी इर्विन चौक दणाणून गेला होता. विदर्भाला महाराष्ट्रात विलीन करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही.
विदर्भ जनआंदोलन समितीने जाळले मोदी, गडकरींचे पुतळे
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनी विदर्भ जनआंदोलन समितीने बडनेरा येथील जुन्या वस्तीतील तेलीपुऱ्यात निषेध आंदोलन केले. स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरतानाच विदर्भ जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन केले. विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीशिवाय दूर होणार नाही. त्यामुळे विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी नेटाने लढा उभारून तो पूर्णत्वास नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.