देवमाळीत ग्रामपंचायतचे स्वतंत्र लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:24 IST2021-02-28T04:24:21+5:302021-02-28T04:24:21+5:30

प्रमुख रस्त्यांवर तपासणी नाके, दुकाने दुपारी १२ पर्यंतच सुरू राहणार, कर्मचाऱ्यांना अप-डाऊन करण्यास मनाई परतवाडा : कोरोना रुग्णांच्या ...

Independent lockdown of Gram Panchayat in Devmali | देवमाळीत ग्रामपंचायतचे स्वतंत्र लॉकडाऊन

देवमाळीत ग्रामपंचायतचे स्वतंत्र लॉकडाऊन

प्रमुख रस्त्यांवर तपासणी नाके, दुकाने दुपारी १२ पर्यंतच सुरू राहणार, कर्मचाऱ्यांना अप-डाऊन करण्यास मनाई

परतवाडा : कोरोना रुग्णांच्या संख्येचे शतकपूर्ण करणाऱ्या आणि कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ बनलेल्या देवमाळीत ग्रामपंचायतने शनिवारी स्वतंत्र लॉकडाऊन घोषित केले आहे.

देवमाळी ग्रामपंचायत कार्यकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीची या अनुषंगाने २७ फेब्रुवारीला एक तातडीची सभा पार पडली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करावयाच्या आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात या सभेत विचारविनिमय झाला. यात त्यांनी स्वतंत्र लॉकडाऊन जारी केले आहे. यात जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंतच सुरू ठेवण्यात यावीत. यानंतर दुकान सुरू ठेवल्यास दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांंसह सर्व व्यक्तींची कोरोनाविषयक चाचणी केली जाणार आहे. लॉकडाऊन दरम्यान देवमाळीत वास्तव्यास असलेल्या कुठल्याही शासकीय तथा खाजगी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या अनुषंगाने अप-डाऊन करण्यात ग्रामपंचायतीने मनाई केली आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकरीच्या मुख्यालयीच थांबावे, ये-जा करू नये, असे निर्देशित करण्यात आले आहे.

देवमाळीतील प्रमुख मार्गावर ग्रामपंचायत नाके उभारणार आहे. तेथे तैनात कर्मचारी थर्मल स्क्रीनिंगसह तपासणी केल्याशिवाय, आवश्यक माहिती घेतल्याशिवाय गावात कुणालाही प्रवेश देणार नाहीत. अत्यावश्यक कामाशिवाय कुणासही ये-जा करता येणार नाही.

गजानन महाराज मंदिर ते मुख्य रस्ता, काशीकर यांच्या घरापासून गणेश मंगलम्, ............ गंशदहा मुख्य रस्ता ते कृषी कार्यालयाजवळीत रस्ता, धरमकाटा ते पेट्रोल पंप, फातिमा रोड, श्रीनगर रस्ता व केदारनगर रस्ता हे पाच नवे कंटेमेन्ट झोन करण्याचा निर्णय सभेत घेतला गेला. ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्यांनाही कोरोना लस देण्याची मागणी करण्यात आली. बैठकीला सरपंच पद्मा सोळंके, उपसरपंच शैलेश म्हाला, सचिव ताज पठाण, पोलीस पाटील तथा स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव प्रताप पाटीलसह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी राहुल सरोदे, रावसाहेब रहाटे यांची उपस्थिती होती. या तातडीच्या सभेत घेण्यात आलेले निर्णय ग्रामपंचायतने तहसीलदार मदन जाधव यांना एका पत्राद्वारे कळविले आहेत.

Web Title: Independent lockdown of Gram Panchayat in Devmali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.