सुपर स्पेशालिटी परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST2021-05-25T04:14:24+5:302021-05-25T04:14:24+5:30

अमरावती : कोरोनावरील उपचारांसाठीच्या सुविधांत भर घालण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नांना अमेरिकन इंडिया फाऊंडेशनची साथ लाभली ...

Independent hospital with 100 beds in super specialty area | सुपर स्पेशालिटी परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय

सुपर स्पेशालिटी परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय

अमरावती : कोरोनावरील उपचारांसाठीच्या सुविधांत भर घालण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नांना अमेरिकन इंडिया फाऊंडेशनची साथ लाभली आहे. दोन महिन्यांत १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी दिली. रुग्णालयाचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरात हे नवे स्वतंत्र रुग्णालय उभे राहणार आहे. त्यात १०० खाटा असतील. त्यातील अतिदक्षता कक्षातील १० खाटांचा समावेश आहे. रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली असून, त्याठिकाणी फाऊंडेशन उभारणीचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर फायबर सिमेंट फ्लोअरिंग, ॲल्युमिनीअम कंपोझिट पॅनेलच्या सहकार्याने ही इमारत उभारण्यात येणार आहे. त्याचा तयार ढाचा बाहेरून आणून तो बसविण्यात येणार आहे. रुग्णालयाची इमारत ऑक्सिजन सुविधेसह सर्व अद्ययावत सोयींनी सज्ज असेल. संपूर्ण प्रकल्पाचे क्षेत्र १५ हजार फूट असून, त्यात आयसोलेशन वॉर्डचे क्षेत्र ५,६०० फूट राहणार आहे. रुग्णालयासाठी मनुष्यबळ, पाणी, ऑक्सिजन, वीज आदींबाबत आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सीएस श्यामसुंदर निकम यांनी दिली.

बॉक्स

फोर झोन स्ट्रॅटेजीवर आधारित रचना

रुग्णालयाची रचना फोर झोन स्ट्रॅटेजीवर आधारित असेल. झोन -१ मध्ये डॉक्टर्स व हेल्थ केअर वर्कर्सचे कार्यालय, झोन दोनमध्ये बाह्यरुग्ण विभाग व चाचणी सुविधा तसेच तेथे लक्षणे असणाऱ्या, मात्र चाचणी अहवाल प्राप्त न झालेल्या रुग्णांचा कक्ष असेल. झोन तीनमध्ये विलगीकरण व उपचार कक्ष असेल. झोन चारमध्ये व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन पाईपलाईन, काँन्सट्रेटर्स, अतिदक्षता कक्ष उपलब्ध असेल. त्याशिवाय, प्रतीक्षा कक्ष, कन्सल्टेशन रुम, एक्झामिनेशन वॉर्ड आदी कक्षही असतील. रुग्णालयात हवा खेळती राहण्यासाठी टर्बो व्हेंटिलेटर्स असतील.

Web Title: Independent hospital with 100 beds in super specialty area