बिबट्यांची वाढती संख्या, वन विभाग अनभिज्ञ

By Admin | Updated: November 8, 2014 22:29 IST2014-11-08T22:29:40+5:302014-11-08T22:29:40+5:30

मेळघाट वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली असताना याबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे. वनपरिक्षेत्रनिहाय बिबट्यांची संख्या किती? याची आकडेवारी निश्चित नसल्याने बिबट

Increasing number of leopards, forest department ignorant | बिबट्यांची वाढती संख्या, वन विभाग अनभिज्ञ

बिबट्यांची वाढती संख्या, वन विभाग अनभिज्ञ

सीमेवरील वस्त्यांना धोका : शिकारीच्या शोधात शहराकडे वाटचाल
गणेश वासनिक - अमरावती
मेळघाट वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली असताना याबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे. वनपरिक्षेत्रनिहाय बिबट्यांची संख्या किती? याची आकडेवारी निश्चित नसल्याने बिबट हे शिकारीच्या शोधात शहरांकडे वाटचाल करीत आहेत. परिणामी सीमेवरील वस्त्यांना धोका निर्माण झाला असून गत आठवड्यात येथील अर्जुननगर भागात बिबट आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
जिल्ह्यात १४ तालुक्यांपैकी मेळघाटातील धारणी, चिखलदरा या दोन तालुक्यात वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. मात्र, उर्वरित १२ तालुक्यांतदेखील काही जातींचे वन्यप्राणी आढळतात. यात बिबट्यांचा समावेश असून त्यांच्या संख्येबाबत वनविभागात अधिकृत नोंद नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. काही महिन्यांपूर्वी येथील विद्यापीठ परिसरातही बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मात्र, त्यावेळी बिबट्याला जेरबंद करता आले नाही, हे विशेष. अमरावती शहराच्या पूर्वेकडे वडाळी वनपरिक्षेत्र सुरु होत असून या परिक्षेत्रात मोठ्या संख्येने बिबट असल्याची माहिती आहे. वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात बिबट्यांची संख्या किती? याबाबत निश्चित आकडेवारी सांगितली जात नाही. परंतु वडाळी वनपरिक्षेत्रात १० ते १२ बिबट असल्याची विश्वसनीय माहिती आहे. हरणांचे अधिक वास्तव्य असलेल्या वनपरिक्षेत्रात सर्वाधिक बिबट असल्याची माहिती आहे. अमरावती वनविभागांतर्गत पाच वनपरिक्षेत्रांत १२ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे हे दोन तालुके तर वरुडमध्ये वरुड तालुक्याचा समावेश आहे. तसेच वडाळी वनपरिक्षेत्रात अमरावती, भातकुली व नांदगाव खंडेश्वर तालुके, परतवाड्यात चांदूरबाजार, अचलपूर व दर्यापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. मोर्शी वनपरिक्षेत्रात तिवसा, मोर्शी तालुक्यांचा समावेश आहे. या पाचही वनपरिक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. बिबट हा अंत्यत हुशार, चपळ वन्यप्राणी असल्याने तो लहानशा जागेतही दडून राहतो. त्यामुळे तो वस्तीत असल्याचे लक्षात येत नाही.

Web Title: Increasing number of leopards, forest department ignorant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.