बडनेऱ्यात डेंग्यूरुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:18 IST2018-10-03T22:17:58+5:302018-10-03T22:18:27+5:30

बडनेऱ्यात डेंग्यूरुग्णांच्या संख्येत वाढ
बडनेरा : डेंग्यूने बडनेरात कहर केला आहे. गत पंधरवड्यात ३३ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला. डेंग्यूरुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून काहीच उपाय होत नसल्याचे चित्र आहे.
कात्रे टाऊनशिपमध्ये राहणारी १३ वर्षांची सिद्धी सोमेश्वर मोरे ही युवती डेंग्यू पॉझिटिव्ह आहे. ती अमरावतीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. याच परिसरातील सीमा यादगीरे ही २० वर्षांची तरुणीदेखील डेंग्यूने ग्रस्त आहे. माळीपुरा परिसरातील एकलव्य पराले, तुषार वऱ्हेकर, अभिमन्यू डहाके यांनादेखील डेंग्यू या आजाराने घेरले आहे. बडनेऱ्यात डेंग्यूरुग्णांची संख्या वाढतच आहे. त्याचप्रमाणे साथीच्या आजारानेदेखील रुग्ण त्रस्त आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी आहे. जुनी वस्ती परिसरात स्वच्छतेबाबत प्रशासन काळजी घेत नसल्याने साथरोग बळावले आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
डेंग्यू पॉझिटिव्ह असलेली माझी मुलगी अमरावतीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. बडनेरा शहरात डेंग्यूरुग्ण मोठ्या संख्येत आहे. आमच्या भागात स्वच्छतेवर भर द्यावा. डासांचा नायनाट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- जयश्री मोरे
माजी नगरसेविका