अमरावतीत प्रवाशांचा वाढला ओढा; पण एसटीकडे ११० बसेसचा खोडा
By जितेंद्र दखने | Updated: May 6, 2023 17:55 IST2023-05-06T17:54:45+5:302023-05-06T17:55:02+5:30
जिल्ह्यात एसटीचे आठ आगार आहेत. २०१९ मध्ये जिल्ह्यात ४६५ एसटीच्या बस होत्या.

अमरावतीत प्रवाशांचा वाढला ओढा; पण एसटीकडे ११० बसेसचा खोडा
अमरावती : प्रवासी आहेत, चालक-वाहक आहेत, पण विभागात ११० बस कमी असल्यामुळे एसटीच्या प्रवासी वाहतुकीचे नियोजन विस्कटल्याचे चित्र आहे. नागपूर, यवतमाळ व जिल्हांतर्गत प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांना बस स्थानकावर अर्धा ते एक तास वाट पाहावी लागत आहे. खरे तर सध्या गर्दीचा हंगाम आहे. अशातच महिलांना अर्धे तिकीट, ज्येष्ठांना सवलत, यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत नवीन बसेस आणून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न होणे अपेक्षित होते, पण तसा कोणताही प्रयत्न वरिष्ठ कार्यालयाकडून होत नाही. पुरेशा गाड्या व सुविधा दिसत नाहीत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
जिल्ह्यात एसटीचे आठ आगार आहेत. २०१९ मध्ये जिल्ह्यात ४६५ एसटीच्या बस होत्या. त्यातील ७४ बसचे आयुर्मान संपल्याने या बस निर्लेखित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजघडीला एसटी महामंडळाकडे ३५८ बस आहेत. यापैकी साधारपणे ३० ते ४० बस गाड्या तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीसाठी असतात. परिणामी, आहे त्या बसद्वारेच प्रवासी वाहतूक केली जाते. एसटीकडे प्रवासी वाढले आहेत, पण या प्रवाशांचे नियमन करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याचे जिल्ह्याचे चित्र आहे. यापूर्वी ८५ हजारांवर प्रवासी संख्या होती. यामध्ये ४० ते ५० हजार प्रवाशांची वाढ होत आहे. सध्या दररोज १ लाख ५ हजार प्रवासी वाहतूक होते आहे. यातून सुमारे ४० लाखांवर महसूल एसटीकडे उपलब्ध होतो. बस भंगारात काढण्यात आल्या. मात्र, यात नवीन बसेसची भर पडली नाही. २० नवीन साध्या बसेस उपलब्ध होणार आहेत. याशिवाय १०४ इलेक्ट्रिक बस येणार आहेत. मात्र, यापैकी एकही बस आज रोजी महामंडळाकडे उपलब्ध झालेली नाही. प्रवाशांच्या सेवेत ज्या गाड्या असतात. या बस अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. लांब पल्ल्याच्या बसेस मिळत नाहीत, प्रवाशांना बस स्थानकावर प्रतीक्षा करावी लागत आहे. बऱ्याच बसेसमध्ये कोंबून जात प्रवास करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून, एसटी प्रशासनाने एसटी वेळापत्रक नियमित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा प्रवाशांतून व्यक्त केली जात आहे.
महिला प्रवाशी वाढलेत
राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेसमध्ये महिलांना तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत दिली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, ६५ वर्षांवरील नागरिकांनाही सवलत आहे. परिणामी, एसटी बसेसकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. यात महिला प्रवासी संख्या ही लक्षणीय वाढली आहे. विभागात दरदिवशी ४५ हजारांवर महिला एसटी बसेसमधून प्रवास करत आहेत. परिणामी, प्रवासी वाढले, तरी एसटी बसेस वाढल्या नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते.
दृष्टिक्षेप बसची स्थिती-
आगार - ०८
बस संख्या - ३५८
दुरुस्तीसाठी बसेस - ३०
दररोजचे प्रवासी - १ लाख ०५ हजार
महिला प्रवासी - ४५ हजारांवर
दरदिवशी उत्पन्न - ४० लाख
दररोजचे अंतर - १ लाख १० हजार
दररोज फेऱ्या १,८५२