‘त्या’ सात जणांची धाकधूक वाढली; दिलासा की अटक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:36+5:302021-07-07T04:15:36+5:30

अमरावती : येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेशी संबंधित ३ कोटी ३९ लाख रुपयांच्या आर्थिक अपहारप्रकरणी मंगळवारी शहर पोलिसांच्या आर्थिक ...

‘That’ increased the panic of the seven; Comfort stuck? | ‘त्या’ सात जणांची धाकधूक वाढली; दिलासा की अटक?

‘त्या’ सात जणांची धाकधूक वाढली; दिलासा की अटक?

अमरावती : येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेशी संबंधित ३ कोटी ३९ लाख रुपयांच्या आर्थिक अपहारप्रकरणी मंगळवारी शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तीन आरोपींसंबंधात ‘से’ दाखल केला. मात्र, आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला वेळ मागून घेतला. अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग राठोड, निलंबित सांख्यिकी अधिकारी राजेंद्र कडू व संबंधित कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक अजितसिंग मोंगा यांच्या याचिकेवर ९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. पोलिसांच्या से दाखल केल्याने ९ जुलै रोजी न्यायालय त्यांना दिलासा देते की, अटकपूर्व जामीन नाकारला जातो, हे स्पष्ट होणार आहे.

सुमारे ७०० कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीपोटी ३.३९ कोटी रुपये दलाली देण्यात आली. त्यात जिल्हा बँकेची आर्थिक फसवणूक झाली, अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी संदीप जाधव यांनी शहर कोतवाली पोलिसांत नोंदविली होती. बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, चार अन्य अधिकारी, कर्मचारी व सहा ब्रोकर्सविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १७ जून रोजी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने बँकेत जाऊन अनुषंगिक दस्तावेज ताब्यात घेतल्याने ११ पैकी सात जणांनी अटकपूर्व जामिनासाठी स्थानिक न्यायालयात धाव घेतली. पैकी राजेंद्र गांधी, नीता गांधी, पुरुषोत्तम रेड्डी व शिवकुमार गट्टाणी यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी झाली. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर ७ जुलै रोजी आदेश होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर हे अधिक तपास करत आहेत.

बॉक्स

हे आहेत गुन्हा दाखल झालेले आरोपी

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे.सी. राठोड, कर्मचारी नीळकंठ बी. जगताप, सुधीर ब. चांदूरकर, राजेंद्र गणेशराव कडू, रोहिणी सुभाष चौधरी यांचेसह शेअर व म्युचुअल फंडचे दलाल अजितपाल हरिसिंग मोंगा, नीता राजेंद्र गांधी, पुरुषोत्तम रेड्डी, शोभा मधुसूदन शर्मा, शिवकुमार गोकुलदास गट्टाणी व राजेंद्र मोतीलाल गांधी. त्यांच्याविरुद्ध १५ जून रोजी शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: ‘That’ increased the panic of the seven; Comfort stuck?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.