कोरोना काळात वाढल्या शेतकरी आत्महत्या (सरते वर्ष)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST2020-12-31T04:14:17+5:302020-12-31T04:14:17+5:30

अमरावती : यंदा मार्च महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक उपायोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २६८ शेतकऱ्यांनी ...

Increased farmer suicides during Corona period (last year) | कोरोना काळात वाढल्या शेतकरी आत्महत्या (सरते वर्ष)

कोरोना काळात वाढल्या शेतकरी आत्महत्या (सरते वर्ष)

अमरावती : यंदा मार्च महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक उपायोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. याच कालावधीत २०१९ मध्ये २४५ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. याच वर्षी १.१२ लाख शेतकऱ्यांना ८०८ कोटींची कर्जमाफी मिळाली असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही, हा सरत्या वर्षात जिल्ह्यास हादरा आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन आहे. सलग तीन लॉकडाऊनमध्ये शेतकरी घरीच असल्यामुळे शेतकरी आत्महत्यामंध्ये कमी येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अन् नापिकी यामुळे जगावे कसे या विवंचनेत, मुलामुलींचे शिक्षण, लग्न आदी प्रश्न भर टाकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे व शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे दुर्दैवी चित्र जिल्ह्यात आहे.

यंदाच्या खरीपात सुरुवातीला कमी पाऊस, सोयाबीनच्या वांझोट्या बियाण्यांमुळे दुबारचे संकट व नंतर ऑगस्टपासून पावसाची लागलेली रिपरिप यामुळे खरीपाचे सोयाबीन, मूग व उडीद हातचे गेले. कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला व सततच्या पावसामुळे ८० टक्के पिकावर बुरशीजन्य रोगामुळे बोंडसडचे संकट उद्भवले. यामध्ये धीर खचून शेतकरी मृत्यूचा मार्ग अबलंबित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आता शासन, प्रशासनासोबत समाजमनाने देखील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज निर्माण झालेली आहे.

बॉक्स

शेतकरी आत्महत्यांची तुलनात्मक स्थिती

महिना सन २०१९ सन २०२०

जानेवारी २० २४

फेब्रुवारी १९ २७

मार्च २४ १४

एप्रिल १७ १३

मे २५ २९

जून २० २९

जुलै २२ ३१

ऑगस्ट २९ २५

सप्टेंबर २६ ३०

ऑक्टोबर १९ २५

नोव्हेंबर २४ २१

एकूण २४५ २६८

बॉक्स

१,१२,२५७ शेतकऱ्यांना ८०८.४७ कोटींची कर्जमाफी

शासनाने दोन लाखांपर्यत थकीत रकमेची कर्जमाफी केली. या योजनेमध्ये १,३३,९४४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. यापैकी १,१३,३७० शेतकऱ्यांनी खात्याचे आधार प्रमाणीकरण केलेले आहे. अद्याप ४,९०७ खात्याचे प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे. आतापर्यत १,१२,२५७ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी ८०८. ४७ कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे.

बॉक्स

लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध

लॉकडाऊन काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी येथील बाजार समितीमधील भाजीपाला व फळ विक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी जागा उपलब्ध केल्यात व पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात शेतकरीपुत्रांनी खुल्या बाजारात मालाची विक्री केली. शेतकऱ्यांही ही बाब सकारात्मक घेऊन दलाल, अडत्यांची मधील साखळी बाद ठरविली. थेट उत्पादक ते ग्राहक असा नवा ट्रेंड या निमित्ताने समोर आलेला आहे.

बॉक्स

पावसाने खरीप उद्‌ध्वस्त, सरसकट मदत नाही

यंदाचा खरीप हंगाम अतिपावसाने बाद झाला, ८० टक्के सोयाबीन व कपाशीचे पीक उद्‌ध्वस्त झाल्याने शासनाने संयुक्त पंचनामे केले. यामध्ये ३,१४,८६९ हेक्टर क्षेत्रामधील पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. ३,४५,६९५ शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास या आपत्तीने हिरावला. यासाठी २३० कोटी ६८ लाख २६ हजारांची मदत आवश्यक असताना शासनाने पहिल्या टप्यात ५० टक्के निधी उपलब्ध केला. ही उपलब्धी असली तरी मदत सरसकट शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

Web Title: Increased farmer suicides during Corona period (last year)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.