गाडगेबाबांच्या कर्मभूमीत व्यसनाधिनतेत वाढ
By Admin | Updated: March 19, 2016 00:17 IST2016-03-19T00:17:11+5:302016-03-19T00:17:11+5:30
तालुक्याला संत गाडगेबाबांचा पदस्पर्श लाभला आहे. गाडगेबाबांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रध्दा, दारू, जुगार व्यसनाधिनता यावर कीर्तनातून प्रहार केलेत.

गाडगेबाबांच्या कर्मभूमीत व्यसनाधिनतेत वाढ
गुटख्याची सर्रास विक्री : अवैध धंदेधारकांची हिंमत वाढली
अचलपूर : तालुक्याला संत गाडगेबाबांचा पदस्पर्श लाभला आहे. गाडगेबाबांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रध्दा, दारू, जुगार व्यसनाधिनता यावर कीर्तनातून प्रहार केलेत. अशा या कर्मयोगी संताच्या पवित्र भूमित व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अचलपुरात गाडगेबाबांचे कीर्तन झाले होते. त्यांच्या नावाने स्वयंसेवी संस्था चालविल्या जातात. असे असतानाही काही समाजकंटकांनी तालुक्यात अवैध धंदे उघडले आहेत. त्याचा परिणाम समाजातील विविध घटकांवर होत आहे. अचलपूर तालुक्याची सीमा मध्य प्रदेशाला लागून असल्यामुळे सीमावर्ती भागातून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात विदेशी दारू, गुटखा, पान मसाल्याची तस्करी होत आहे. महाराष्ट्रात गुटखा, पान मसाल्यावर बंदी असतानासुध्दा तालुक्यात पानटपरी, किराणा दुकानांमध्ये गुटखा मसाल्याची सर्रास विक्री सुरू आहे. शहरालगत असलेल्या काही ढाब्यांवर परवानाशिवाय दारुविक्री बिनदिक्कतपणे होत आहे. अवैध दारूविक्रीला तर सणांच्या दिवशी उधाणच येते. सणासुदीच्या दिवसांत ढाबा मालकाची चांदी असते. याकडे पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचा आरोेप जनता करीत आहे.
राजरोसपणे गुटखा व पान मसाल्यांची विक्री होत असताना अन्न व औषधी प्रशासन विभाग साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. तालुक्यात देशी दारुची परवानाधारक दुकाने आहेत. शासनाच्या नियमानुसार सकाळी १० ते रात्री १० पर्यंत ती उघडी ठेवण्याचे आदेश आहेत.
मात्र, दारुविक्रेते सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास दारुची विक्री करीत आहेत. त्यामुळे सकाळपासून मद्यपींची गर्दी अचलपूर-परतवाड्यातील चौका-चौकांत बघायला मिळत आहे. धंदावाढीसाठी व अधिक पैसा कमविण्यासाठी मध्यस्थांच्या माध्यमातून दारुच्यापेट्या गावोगावी पोहोचविल्या जातात. येथील ग्रामीण भागात चिल्लर दारू विक्रेत्यांचे मोठे नेटवर्क आहे. हल्ली तालुक्यातल लहान गावातही दारू मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे व्यवसनानिधतेचे प्रमाण वाढले आहे. यावर अंकुश लावण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)