अल्पवयीन मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: July 11, 2015 00:34 IST2015-07-11T00:34:38+5:302015-07-11T00:34:38+5:30
अल्पवयीन मुले-मुली प्रेमप्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत शहरातील १६ जण बेपत्ता आहेत.

अल्पवयीन मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले
अद्याप १६ जण बेपत्ता : आॅपरेशन मुस्कान मोहिमेतून शोध सुरु
वैभव बाबरेकर अमरावती
अल्पवयीन मुले-मुली प्रेमप्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत शहरातील १६ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध आॅपरेशन मुस्कान मोहिमेतून पोलीस विभाग घेत आहेत.
शहरातील १८ वर्षांखालील मुलांमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागल्याने त्यांचे पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे गुन्ह्यासंदर्भात तक्रारीवरून लक्षात येत आहे. कमी वयात मुले-मुली आधुनिक तत्रंज्ञानाच्या माध्यमातून लैंगिक विषयाची माहिती घेत आहेत. त्या अनुभवातून अल्पवयीन प्रेमाच्या आहारी जात असल्याचे मनोरुग्ण तज्ज्ञ अमोल गुल्हाने यांचे मत आहे.
शहरात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनासोबत पालकवर्गही हतबल झाले आहेत. मागील दोन वर्षांत ८० अल्पवयीन पळून गेल्याच्या तक्रारी पोलीस विभागाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीवरून पोलीस विभागाने अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ६४ अल्पवयीनांचा शोध पोलीस विभागाने घेतला असून १६ जणांचा शोध सुरू आहे. यातील बहुतांश अल्पवयीन प्रेमप्रकणातून पळून गेल्याचे पोलीस विभागाच्या निदर्शनास आले आहे. बेपत्ता १६ अल्पवयीनांमध्ये १२ मुली व ४ मुलांचा सहभाग आहे.
साधारणत: १८ वर्षांवरील मुलां-मुलीमध्ये प्रेमप्रकरणे कायद्यानुसार ग्राह्य धरले जाते. मात्र, अल्पवयीनांतही प्रेम प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर आवर घालण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवीत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानातून अनुभव
पूर्वीच्या काळात अल्पवयीनांना लैंगिक व्यवहाराची माहिती उशिरा कळत होती. मात्र, आताच्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून लवकरच लैंगिक व्यवहाराबाबत अल्पवयीन मुले-मुली ज्ञात होत आहेत. त्यामुळे आताच्या पिढीतील मुलांं-मुलींचे हार्मोन्सचा विकास लवकरच होत आहे. परिणामी अल्पवयीनांमध्ये म्यॅचुरिटी येत असल्याचे मनोरुग्ण तज्ज्ञांचे मत आहे.
पाल्यांना भविष्याची जाणीव करुन देणे योग्य
पालकांनी आपल्या मुलांना भविष्यातील जबाबदारीची जाणीव करुन देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. मुलांना भविष्यात काय करायचे आहे. पुढे त्यांना कशा प्रकारे कुटुंबीयांंची जबाबदारी सांभाळायची आहे. आपण कुठे चुकत आहेत आदींची मुला-मुलींना जाणीव करून देणे आजच्या काळाची गरज आहे. आताच्या चुकीमुळे आपल्याला पुढील जीवनात पश्चातापाची वेळ येऊ नये याकरिता पालकांनी पाल्याना वारंवार जबाबदारीची आठवण करून देणे गरजेच्े असल्याचे मत मनोरुग्ण तज्ज्ञ अमोल गुल्हाने यांनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अल्पवयीनांना मोबाईल, टीव्ही व इंटरनेट सारख्या माध्यमातून लैंगिक व्यवहाराची सर्व माहिती मिळते. त्यामुळे मुलांमध्ये म्यॅच्युरिटी लवकरच येत आहे. अल्पवयीनांना पुढील जीवनातील जबाबदारीची जाणीव नसते. पालकांनी मुलांना वारंवार याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे.
- अमोल गुल्हाने, मनोरुग्ण तज्ज्ञ.
आॅपरेशन मुस्कान मोहिमेतून मुलां-मुलींची शोध मोहीम सुरु आहे. यामध्ये अधिकाधिक मुल-मुली प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी बहुतांश मुलांचा शोध घेण्यात आला असून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
- रियाजुद्दीन देशमुख, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.