२३४१ शेततळ्यांचा वाढीव लक्षांक
By Admin | Updated: January 9, 2017 00:19 IST2017-01-09T00:19:39+5:302017-01-09T00:19:39+5:30
शेतीमध्ये शाश्वतता आणण्यासाठी कृषी विभागाद्वारा शेततळ्यांची योजना राबविण्यात येते.

२३४१ शेततळ्यांचा वाढीव लक्षांक
मागेल त्याला शेततळे योजना : दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक १२०० शेततळे होणार
अमरावती : शेतीमध्ये शाश्वतता आणण्यासाठी कृषी विभागाद्वारा शेततळ्यांची योजना राबविण्यात येते. जिल्ह्यास २०१६-१७ वर्षाकरिता ३ हजार १५९ शेततळ्यांचे लक्षांक होते. परंतु सुधारित शासन निर्णयान्वये आता जिल्ह्यास २ हजार ३४१ शेततळ्यांचे लक्षांक देण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात ४ हजार ५०० शेततळ्यांची कामे होणार आहेत.
दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाची ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू केली होती व यंदाच्या वर्षात जिल्ह्यात ३,१५९ शेततळ्याचे लक्षांक दिले होते. परंतु आता तालुकानिहाय सुधारित लक्षांक शासनाने वाढवून दिले आहे.
त्यानुसार जिल्ह्यात आता ४५०० शेततळ्यांचे लक्ष्यांक देण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत कमीत कमी १५ बाय १५ बाय ३ मीटर आकाराचे व जास्तीत जास्त ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराच्या शेततळ्यास परवानगी देण्यात येते. प्रती शेततळ्यास जास्तीत जास्त ५० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच गेल्या पाच वर्षात एकदा तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावातील शेतकऱ्याां प्राधान्याने शेतकऱ्यांचा लाभ दिल्या जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे किमान ०.६० हेक्टर जमीन असणे महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांसाठी संबंधित शेताचा सातबारा, आठ अ उतारा, ही कागदपत्रे आवश्यक आहेत. यापैकी दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसाचा दाखला असणाऱ्या शेतकऱ्यांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्य देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी आपले सरकार या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
वैयक्तिक, सामूहिक शेततळ्याला
पूर्व परवानगी आवश्यक
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकासाठी प्लास्टिक फिल्म अस्तरीकरणासाठी अर्थसाहाय्य योजना आहे. तथापी फक्त फळबाग, भाजीपाला, फुले व औषधी वनस्पती आदीसाठी शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी मंजूर खर्चाच्या ५० टक्के किंवा अधिकतम ७५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देत राहते. यंदाच्या वर्षाकरिता जिल्ह्यात दोन हजार व पाच हजार घनमीटरचे लक्षांक प्राप्त आहे. यामध्ये वैयक्तिक शेततळे, अस्तरीकरण, सामूहिक शेततळे या घटकाला पूर्वसंमती आवश्यक आहे. या घटकांनी १० जानेवारीपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन आहे.
असे आहे शेततळ्यांचे तालुकानिहाय लक्षांक
सुधारित आदेशानुसार जिल्हात चार हजार ५०० शेततळ्यांचे लक्षांक आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात २००, भातकुली १०००, नांदगाव खंडेश्वर २५०, चांदूररेल्वे २००, धामणगाव १००, मोर्शी २५०, वरूड २००, तिवसा २००, चांदूरबाजार २००, अचलपूर २००, दर्यापूर १२००, अंजनगाव सुर्जी ४००, चिखलदरा २० व धारणी तालुक्यात ८० शेततळ्याचे लक्ष्यांक आहे.