नगरपालिका निवडणुकीवर इन्कम टॅक्स विभागाचे लक्ष

By Admin | Updated: October 27, 2016 00:07 IST2016-10-27T00:07:18+5:302016-10-27T00:07:18+5:30

जिल्ह्यात ९ नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून उमेदवारांच्या वारेमाप खर्चावर आता आयकर विभागाची नजर राहणार आहे.

Income Tax Department's attention on municipal elections | नगरपालिका निवडणुकीवर इन्कम टॅक्स विभागाचे लक्ष

नगरपालिका निवडणुकीवर इन्कम टॅक्स विभागाचे लक्ष

वारेमाप खर्चावर अंकुश : उमेदवारांच्या हालचालींवरही नजर
अमरावती : जिल्ह्यात ९ नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून उमेदवारांच्या वारेमाप खर्चावर आता आयकर विभागाची नजर राहणार आहे. त्याकरिता आयकर विभागाने स्वतंत्र चमू तयार केली आहे. विशेषत: श्रीमंत उमेदवारांकडून होणाऱ्या पैशांच्या उलाढालींवर ‘ब्रेक’ लावण्याची तयारी करण्यात आली आहे.
नगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजताच जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली. त्याअनुषंगाने पदाधिकाऱ्यांची वाहने, शासकीय सुविधांना कात्री लावण्यात आली आहे. विशेषत: प्रशासनाने आचारसंहितेतील ९ तरतुदींचे काटेकोपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंत पवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र मालमत्ता विरूपण करणे प्रतिबंध कायदा १९५५ नुसार या कायद्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स प्रसिद्ध करु नयेत, राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी पूर्वपरवानगी शिवाय बैठकांचे आयोजन करू नये, अशा सूचना प्रशासनाकडून राजकीय पक्षप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. नगरपालिकांची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन, आमिष देताना होणाऱ्या पैशांच्या व्यवहारावर आता आयकर विभागाची चमू लक्ष ठेऊन राहणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गित्ते यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या अनधिकृत व्यवहारावर चाप बसविण्यासाठी आता आयकर विभागाच्या चमुला मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयकर विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे.

निवडणुकीत गैरमार्गाने पैशांचा व्यवहार होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मार्गदर्शक सूचना कळविण्यात आल्या आहेत. यावेळी निवडणुकीत आयकर विभागाला विशेष कामगिरी पार पाडावी लागेल.
- किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती.

Web Title: Income Tax Department's attention on municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.