‘सिटी लँड’मध्ये आयकर विभागाचे व्यापाऱ्यांना अभय
By Admin | Updated: October 19, 2015 00:37 IST2015-10-19T00:37:34+5:302015-10-19T00:37:34+5:30
येथील आयकर विभागाने गत १५ दिवसांपूर्वी नागपूर महामार्गालगतच्या ‘सिटी लँड’ या व्यापारी संकुलात धाडसत्र राबविले. ...

‘सिटी लँड’मध्ये आयकर विभागाचे व्यापाऱ्यांना अभय
अमरावती : येथील आयकर विभागाने गत १५ दिवसांपूर्वी नागपूर महामार्गालगतच्या ‘सिटी लँड’ या व्यापारी संकुलात धाडसत्र राबविले. सलग चार दिवसपर्यंत चाललेल्या कारवाईनंतर मोठे घबाड बाहेर काढण्याऐवजी आयकरचे अधिकारी काही व्यापाऱ्यांना अभय देत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
एक-दोन नव्हे तर ४५ ते ५० व्यापाऱ्यांवर धाडी टाकून साहित्य, कागदपत्रे जमा करण्याचची किमया आयकर विभागाने केली होती. येथील आयकर विभागाने ही कारवाई नागपूर येथील आयकर आयुक्तांच्या आदेशानुसार केली होती. तब्बल चार दिवसपर्यंत कारवाईचे सत्र सुरू राहिले. मात्र, ‘सिटी लँड’वर कोणत्या स्वरुपाची कारवाई करण्यात हे अद्यापर्यंत गुलदस्त्यात आहे. किती व्यापाऱ्यांवर कारवाई झाली, नेमके किती दंड आकारण्यात आला, कारवाईचे स्वरुप काय? आदी बाबी आयकर विभागाने दडून ठेवल्या आहेत. आयकर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही ‘रुटीन’ कारवाई असल्याचे सांगून बऱ्याच बाबी ते दडपत असल्याचे वास्तव आहे. रिटर्न तपासूनच व्यापारी, डॉक्टर्स, प्रतिष्ठाने आदींवर धाडसत्र राबविले जाते. मोठा ताफा, गाजावाजा करून आयकर विभाग धाडी टाकतात. मात्र पुढे कोणत्या स्वरुपाची कारवाई केली, हे कधीच उघडकीस येत नाही. परिणामी आयकरचे धाडसत्र म्हणजे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे म्हणण्याचा प्रसंग उद्भवला आहे. ‘सिटी लँड’ हे व्यापारी संकुल जिल्ह्यात सर्वात मोठे आहे. येथे रोज कोट्यवधींची उलाढाल होते. येथील व्यापाऱ्यांचे रिटर्न तपासल्यानंतर कारवाईची दिशा ठरली. चार दिवसपर्यत कारवाई चालल्यानंतर त्यांना समंस बजावण्यात आले. सुनावणीची तारीख निश्चित झाली. मात्र आयकरच्या बड्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने झुकतेमाप दिल्याने आयकर विभाग दंडात्मक रक्कमेपासून मुकल्याची माहिती आहे. एका आमदाराने ‘सिटी लँड’मध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना यात ‘डोके’ न घालण्याचा सल्ला दिल्यामुळे १२ ते १५ कापड व्यापाऱ्यांना बरीच सूट मिळाल्याची माहिती आहे. ‘सिटी लँड’च्या धाडसत्रात नेमके काय झाले, हे आयकर विभागाने समोर आणावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.