गौरी इनजवळील घटना : टँकरचालक पसार
By Admin | Updated: January 8, 2016 00:25 IST2016-01-08T00:25:23+5:302016-01-08T00:25:23+5:30
अज्ञात टँकरच्या धडकेत दुचाकीवर जात असलेले सुरक्षा रक्षक ठार झाले असून त्यांच्यासोबतच्या महिला गंभीर जखमी झाल्या.

गौरी इनजवळील घटना : टँकरचालक पसार
अमरावती : अज्ञात टँकरच्या धडकेत दुचाकीवर जात असलेले सुरक्षा रक्षक ठार झाले असून त्यांच्यासोबतच्या महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मोर्शी मार्गावरील गौरी इन हॉटेलसमोर घडली. नारायण महादेव तायडे (४०,रा. केवल कॉलनी) असे मृताचे तर संगीता दादाराव वानखडे (३५,रा. छत्रसालनगर) असे जखमीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, मृत नारायण तायडे हे शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत आहेत. ते गुरुवारी सकाळी संगीता वानखडे या महिलेसोबत दुचाकी क्रमांक एमएच २७- एएस- ७२४७ ने रहाटगावाहून अमरावतीकडे येत होते. दरम्यान मोर्शी मार्गावरील गौरी इन हॉटेलसमोर विरुध्द दिशेने येणाऱ्या अज्ञात टँकरने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात नारायण तायडे हे टँकरच्या चाकात आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संगीता वानखडे या रक्तबंबाळ अवस्थेत मार्गावर कोसळल्या होत्या. अपघातानंतर टँकर घटनास्थळावरून पसार झाला. त्या मार्गाने जाणारे धूळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सचिन एकनाथ कोरडे यांच्या दृष्टीस पडताच त्यांनी तत्काळ जखमीची तपासणी केली. त्यावेळी नारायण हे मृतावस्थेत आढळून आले, तर गंभीर जखमी महिलेला त्यांनी जवळील वाहनात टाकून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्यामुळे संगीता हिच्यावर तत्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुंड यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. नारायण तायडे यांचा मृतदेह इर्विनच्या शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी करीत आहेत. (प्रतिनिधी)