योग्य उपचारांनी भाग्यश्रीच्या प्रकृतीत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST2021-06-27T04:09:57+5:302021-06-27T04:09:57+5:30
पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर आजारी बालिकेच्या उपचारासाठी अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांचा पुढाकार अमरावती : जिल्ह्यातील देवरा या गावातील चिमुकल्या भाग्यश्रीची ...

योग्य उपचारांनी भाग्यश्रीच्या प्रकृतीत सुधारणा
पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर आजारी बालिकेच्या उपचारासाठी अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांचा पुढाकार
अमरावती : जिल्ह्यातील देवरा या गावातील चिमुकल्या भाग्यश्रीची प्रकृती जन्मत: कमी वजन आणि मेंदूतील इन्फेक्शनामुळे बिघडली होती. हे कळताच तातडीने उपचार मिळवून देण्याचे निर्देश यंत्रणेला देतानाच बालिकेवर चांगल्या रुग्णालयात उपचार होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत अंगणवाडी सेविका व नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून चिमुकलीला उपचार मिळवून दिले. आता या बालिकेच्या प्रकृतीत चांगली सुधारणा आहे. पालकमंत्र्यांनी शनिवारी भाग्यश्रीची भेट घेऊन विचारपूस केली व आर्थिक मदतही केली.
भाग्यश्रीला चांगल्या उपचारांची गरज होती. महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आवाहन केल्यानंतर अंगणवाडी सेविका उमा वाघमारे यांच्या समन्वयाने आणि विविध नागरिक व कार्यकर्त्यांनी गावातून लोकवर्गणी गोळा केली तसेच उपचाराचा खर्च करण्याची जबाबदारी उचलली. यानंतर भाग्यश्रीवर नागपूरमध्ये उपचार करण्यात आले. आता तिची तब्येत चांगली झाली असून, ती घरी परतली आहे. ना. ठाकूर यांनी शनिवारी देवरा येथे भाग्यश्रीची तिच्या घरी जाऊन प्रकृती पाहिली व कुटुंबाला आर्थिक मदतही केली. त्याचबरोबर या सर्व काळात भाग्यश्रीच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणाऱ्या आणि भाग्यश्रीच्या उपचारासाठी लोकवर्गणी गोळा करणाऱ्या अंगणवाडी सेविका उमा वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.