अपंग शाळांचा दर्जा सुधारणार
By Admin | Updated: October 1, 2015 00:23 IST2015-10-01T00:23:23+5:302015-10-01T00:23:23+5:30
जिल्ह्यातील अपंगांच्या विशेष शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे

अपंग शाळांचा दर्जा सुधारणार
जिल्हा परिषदेत : जिल्हास्तरीय समिती गठनाचा शासनाचा निर्णय
अमरावती : जिल्ह्यातील अपंगांच्या विशेष शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी पुढील महिन्यापासून कार्यवाही सुरु होणार आहे. यावर जिल्हा परिषद आणि सामाजिक न्याय विभागाचे नियंत्रण राहील. यापूर्वी अशा उपाययोजना केल्या होत्या. परंतु पाहिजे त्या प्रमाणात अपंग विद्यार्थ्यांना लाभ झालेला नाही.
अपंगाच्या विशेष शाळा आणि शाळांचा दर्जा सुधारण्याची जबाबदारी समितीकडे आहे. स्वयंसेवी संस्थेंतर्गत येणाऱ्या अपंगांच्या शाळांचा दर्जा वाढवून विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी समिती गठित करण्याचे शासनाने ठरविले होते. त्याला आता मुहूर्त लाभला आहे. अपंग शाळांची दूरवस्था झाली आहे. शाळांच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. पाण्याची सुविधा, मनुष्यबळ नाही, विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. जिल्हा परिषद, आदिवासी विभागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यातच आता अपंगांच्या शाळांना उतरती कळा लागण्याची शक्यता आहे.
या समस्येतून बाहेर काढण्याची महत्त्वाची जबाबदारी समितीवर असणार आहे. समितीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, तर अपंग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार जणांची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. पालक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येक प्रवर्गातून एक व्यक्ती, नामांकित विशेष शाळांचे अध्यक्ष किंवा सचिव जिल्हा समाजकल्याण अधिकारी सदस्य सचिव म्हणून राहणार आहेत.