खासगी ले-आऊटमध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी
By Admin | Updated: June 30, 2017 00:12 IST2017-06-30T00:12:41+5:302017-06-30T00:12:41+5:30
दिया ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या तलई कॅम्प या शासकीय ले-आऊटमध्ये रस्ते व नाल्यांअभावी या क्षेत्रात जागोजागी नाल्यांचे पाणी साचलेले आहे

खासगी ले-आऊटमध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी
दुर्लक्ष : दिया ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : दिया ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या तलई कॅम्प या शासकीय ले-आऊटमध्ये रस्ते व नाल्यांअभावी या क्षेत्रात जागोजागी नाल्यांचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे परिसरात डासांची निर्मिती झाल्याने रोगराई पसरत आहे. ताप, सर्दी, खोकला यासारखे संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
धारणी शहराला लागून पूर्वेला तलई कॅम्प हा भाग येतो. परंतु या क्षेत्राचा समावेश दिया ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला आहे. दिया ग्रामपंचायतीमध्ये तलई, टाकरखेडा, चिखलपाट आणि तलई कँप या ४ गावांचा समावेश आहे. तलई कँपला लागूनच हरिहरनगर हे खासगी ले-आऊट आहे. या ले-आऊटमध्ये दिया ग्रामपंचायततर्फे अवैधरीत्या रस्ते व नाल्यांचे बांधकाम केले आहे. परंतु तलई कँप हा भाग शासकीय ले-आऊटमध्ये येत असल्याने याकडे ग्रामपंचायतीचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
तलई कँप परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. प्राध्यापक कॉलनीसह फुकटपुरा म्हणून ओळख असलेला स्लम भूभागाचाही यात समावेश आहे. मात्र फॉरेस्ट नाल्यालगतच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर अतिक्रमण झाले आहे.
ग्रामसेवक बेपत्ता
दिया ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नेहमी बेपत्ता असतात. त्यामुळे आपली गाऱ्हाणी कोणाकडे मांडावी याच विवंचनेत नागरिक आहेत. या भागात नाल्यांची त्वरित निर्मिती करून रोगांपासून मुक्ती देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यासाठी गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांच्याकडूनच नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत.