मेळघाटात रेती तस्करांचे साम्राज्य
By Admin | Updated: October 28, 2014 22:50 IST2014-10-28T22:50:29+5:302014-10-28T22:50:29+5:30
गतवर्षी करण्यात आलेल्या रेती लिलावाची मुदत संपली आहे. त्यामुळे १ आॅक्टोबरपासून रेती उपसा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकृतरीत्या

मेळघाटात रेती तस्करांचे साम्राज्य
धारणी : गतवर्षी करण्यात आलेल्या रेती लिलावाची मुदत संपली आहे. त्यामुळे १ आॅक्टोबरपासून रेती उपसा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकृतरीत्या रेतीघाटांचा लिलाव होत नाही तोपर्यंत मेळघाटातील कोणत्याही रेतीघाटातून रेती काढण्यास परवागी नाही. नियमाला न जुमानता रेतीचा उपसा केल्यास फौजदारी केली जाईल, असे आदेश असतानाही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून रेती तस्करीचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.
धारणी तालुक्यात तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांसह शेकडो लहानमोठे जाळे आहेत. यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात पुरात वाहून हजारो ब्रास रेती जमा होते. नदी-नाल्याच्या पात्रातून पाणी कमी झाल्यावर रेतीचा उपसा करण्यात येत असतो. मागील वर्षी केवळ तापी नदीवरील ६ घाटांचा जाहीर लिलाव करण्यात आला होता. याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. हा कंत्राट कुसुमकोट बु। येथील शासकीय कंत्राटदार नौशाद हाजी अ. कादर यांनी घेतला होता. आता कंत्राटाची मुदत संपल्याने रेती घाट वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.
कंत्राट संपल्याने कंत्राटदारांची माणसे रेतीघाटातून हलविण्यात आल्याने रेतीघाट बेवारस सोडण्यात आले आहे.
या बेवारावस्थेतील घाटात आता रेती तस्करांचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. गावातील कोतवाल, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नजराने देऊन रेती उपसा सुरू झाला आहे. प्रत्येक गावात घरकुलाच्या बांधकामासह शासकीय कामांवर दररोज शेकडो ब्रास रेतीची पूर्तता रेती तस्कर राजरोसपणे करीत आहेत. कामावर आलेल्या रेतीबाबत कोणताही अधिकारी व कर्मचारी चौकशी करीत नाही. केवळ रस्त्यावर वाहतुकीदरम्यान आढळलेल्या ट्रॅक्टरवर थातूरमातूर कार्यवाही करून सोडले जात आहे. १ आॅक्टोबरपासून आतापर्यंत २८ दिवसांच्या कालावधीत एकही फौजदारी करण्यात न झाल्याने कुठेतरी पाणी मुरतेय, असे चित्र मेळघाटात पहावयास मिळत आहे.