झोन कार्यालयात अपहार
By Admin | Updated: June 11, 2016 23:58 IST2016-06-11T23:58:29+5:302016-06-11T23:58:29+5:30
महापालिकेतील झोन क्रमांक ५ या कार्यालयात २.४३ लाख रुपयांचा आर्थिक अपहार उघड आला आहे.

झोन कार्यालयात अपहार
निलंबित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हे : अडीच लाखांची अफरातफर
अमरावती : महापालिकेतील झोन क्रमांक ५ या कार्यालयात २.४३ लाख रुपयांचा आर्थिक अपहार उघड आला आहे. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी वसुली लिपिक पंकज डोणारकर याचेविरुद्ध कलम ३८१, ४०६, भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन पावती पुस्तके गहाळ केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांनी डोनारकर याला ६ जून रोजी तत्काळ प्रभावाने निलंबित केले होते. तसेच फौजदारी तक्रारीचे संकेत दिले होते. भाजीबाजार येथे महापालिकेचे झोन कार्यालय असून पंकज डोणारकर हा या कार्यालयात वसुली लिपिक म्हणून कार्यरत असताना करवसूलीचे पावती पुस्तक गहाळ झाल्याचे प्रकरण उघड झाले होते.
उपायुक्तांच्या अहवालावर निलंबित
अमरावती : करवसुलीचे १२३७९ व १२३९६ ही दोन पुस्तके गहाळ झाली होती. तपासणीदरम्यान ही पावती पुस्तके अन्य सहकाऱ्यांच्या कपाटात ठेवताना आरोपी पंकज डोणारकर आढळून आला. त्याला याबाबत विचारणा केली असता तो निघून गेला. त्यानंतर उपायुक्तांच्या आश्वासानुसार त्याला निलंबित करण्यात आले व त्याची चौकशी प्रारंभ करण्यात आली होती. नवनियुक्त आयुक्त हेमंत पवार आणि उपायुक्त विनायक औघड यांनी आरोपीविरुद्ध फौजदारी तक्रार करण्याचे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)
कबुलीनंतर फौजदारी
आरोपी पंकज डोणारकरने पावती पुस्तक चोरीसह अपहाराची कबुली देऊन झोन कार्यालयात परत केला. मात्र या संपूर्ण प्रकरणात आर्थिक अनियमितता होऊन महापालिकेचे नुकसान झाल्याने त्यांचेविरुद्ध खोलापुरीगेट ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. याच कार्यालयात कार्यरत कनिष्ठ लिपिकाच्या तक्रारीवरून निलंबित कर्मचारी पंकज डोणारकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोणारकरने दिली कबुली
चौकशीदरम्यान संबंधित पावती पुस्तके चोरल्याची कबुली पंकज डोणारकर याने दिली. पावती क्रमांक १२३९५०१ ते १२३९५३९ पर्यंत ३९ पावत्यांमधून २,४३ ५०७ रुपयांची वसुली केली व ही रक्कम स्वत:कडे ठेवल्याची कबुली त्याने दिली आहे.